वाठार स्टेशन (प्रतिनिधी) – वाठार स्टेशन येथून अपहरण केलेल्या पितापुत्रांची पोलीसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सुटका झाली. अपहरणकर्त्या पाच संशयितांना पुणे जिल्ह्यातून अटक करून त्यात पितापुत्रांना पोलीसांनी वाठार स्टेशन येथे सुखरूप आणले.
वाठार स्टेशन येथील कल्याण दत्तात्रय भोईटे (वय 40, मूळ रा. हिंगणगाव ता. फलटण) व त्यांचा 11 वर्षांचा मुलगा या पितापुत्रांचे घरासमोरून मध्यप्रदेशमधील पाच युवकांनी अपहरण केल्याची घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. वाठार पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण भोईटे यांचा भाजीपाला खरेदी- विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी 3 ते 4 तारखे दरम्यानच्या काळात मध्यप्रदेशातून दोन ट्रक वाटाणा मागवला होता. मागवलेल्या मालाचे बिल त्यांनी अदा केले नव्हते.
या थकित बिलाची वसुली करण्यासाठी मध्य प्रदेशातून दिनेश रामलालजी धाकड (वय 31), रवींद्र रामलालजी धाकड (वय 23), मानक गोविंदलालजी धाकड (वय 30, तिघे रा. अमोदिया, जि. रतलाम), मुकेश सत्यनारायण पटेल (वय 30), नितीन मोहनलालजी हाडे (वय 27, दोघे रा. कारोदा, मध्य प्रदेश) हे सर्व पाच संशयित मारुती सुझुकी कंपनीची इको व्हॅन (एमपी04- सीएल 8851) घेऊन वाठार स्टेशन येथे आले. त्यांनी सोमवारी दि. 7 डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास कल्याण भोईटे व त्यांचा मुलगा या दोघांना वाठार स्टेशन येथील घरासमोरून ठार मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने अपहरण करून गाडीमध्ये घालून गाडी कुठेही न थांबवता नारायणगाव (ता. जुन्नर जि. पुणे) या दिशेने घेऊन गेले.
गाडीमधून जाताना अपहरण केलेल्या संशयितांनी थकीत बिलाच्या कारणास्तव भोईटे व त्यांच्या मुलाला शिवीगाळ, दमदाटी केली. दरम्यानच्या काळात अपहरण केलेल्या गाडीमधूनच भोईटे यांनी गुपचूपपणे आपल्याकडील मोबाइलवरून त्यांच्या नातेवाईकांना माझे व माझ्या मुलाचे अपहरण झाल्याचा मेसेज टाकला होता. मेसेज पाहताच नातेवाईकांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली.
मोबाइलच्या लोकेशनवरून पोलिसांनी गतिमान तपास केला. अपहरण केलेल्या संशयितांच्या पुणे येथे जाऊन मुसक्या आवळल्या. अपहरण झालेल्या पितापुत्रांना वाठार स्टेशन येथे सुखरूप आणले. संशयितांना गजाआड केले. वाठार पोलीस ठाण्यात फिर्यादीने अपहरणाची तक्रार दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत. या गुन्ह्यातील पाच संशयितांना आज दि. 9 डिसेंबर रोजी कोरेगाव न्यायालयात हजर केले असता या संशयितांना न्यायालयाने 11 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
फोटो खालील ओळ :- संशयितांनी याच गाडीतून बापलेकाचे अपहरण केले होते. (छाया :- जलालखान पठाण)