सुपे घाटात पठाणी वसुली : प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवून कारवाई करावी
वाहनचालकांसह स्थानिकांची एकमुखी मागणी
मोरगाव (वार्ताहर) – दौंड व बारामती तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या सुपे घाट परिसरात महामार्ग वाहतूक पोलिसांनी सध्या वाहन तपासणीच्या नावाखाली चौफुला मोरगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून वसुलीचा जोरदार सपाटा सुरू केला आहे. या प्रकारामुळे अवघड वळणाचा घाट त्यात पोलिसांच्या वसुलीचा थाट या वाहनचालकांच्या दबक्या आवाजातील चर्चेला सुरुवात झाली आहे. तपासणीच्या नावाखाली वाहनचालकांची अडवणूक करून लूट करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक होत आहे.
शिरूर ते सातारा मार्गावरून बहुतांशी जड वाहतूक करणारी वाहने, लांब पल्ल्याची वाहने याच मार्गाचा अवलंब करत असतात. पुणे शहरातील वाहने लांब पल्ल्याचा मार्ग व बहुतांशी टोलनाके टाळण्यासाठी निकटचा सोईस्कर मार्ग म्हणून या मार्गाला वाहनचालक अधिक पसंती देत आहेत. तसेच अष्टविनायकातील सिद्धटेक ते थेऊर व रांजणगावला जाणाऱ्या भाविकांची या घाटातील मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या सर्व बाबींचा विचार करता सध्या या मार्गावर वाहतुकीची मोठी रहदारी वाढली आहे. परंतु, दौंड व बारामती तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या सुपे घाटात महामार्ग वाहतूक पोलिसांच्या तपासणी नाक्याचा वाहनचालकांना सतत सामना करावा लागत आहे.
अनेकवेळा या घाटात महामार्ग पोलीस व वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी या ठिकाणी तपासणी नाका तयार करून वाहनांची तपासणी करत असतात. सध्या वाहतूक पोलीस कर्मचाचाऱ्यांकडून ठिकाणी तपासणीच्या नावाखाली वाहनचालकांकडून पैसे वसुलीचा सपाटा सध्या जोरदारपणे सुरू झाला आहे. वाहतूक नियमांची भीती व दहशत दाखवून याठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांकडून सध्या वारेमाप वसुली सुरू आहे. सुपे घाटात वाहन तपासणीच्या नावाखाली वसुलीचा थाट सध्या जोरदारपणे सुरू असून आता हे चित्र नित्याचेच झाले आहे.
वाहनचालकांच्या तक्रारी…
या मार्गावरील प्रचंड खड्डे व सुरू असलेल्या कामामुळे वाहन चालक आधीच हैराण झाले असताना आता पोलिसांच्या वसुलीच्या जुलमी तगाद्याने दुष्काळात 13वा महिना अशी जणू भरच पडली आहे. सुपे घाटात यापूर्वी अनेकदा लहान-मोठ्या चोऱ्या लुटीच्या घटना तसेच अनेक अपघात घडले आहेत; परंतु अशावेळी वाहनचालकांना पोलिसांकडून कोणतीच मदत किंवा संरक्षण मिळत नसल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. संकटकाळी मदतीला वाहतूक पोलीस येत नाहीत; मात्र वसुलीसाठी एकही संधी सोडत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आमच्याकडील वाहतूक शाखेचे सध्या एकच पोलीस अधिकारी असून मुख्य रस्त्यांवर कारवाईसाठी जाताना चारचाकी वाहनांचा वापर होत नाही. पुणे वाहतूक शाखेचे काही अधिकारी व कर्मचारी हे चार चाकी गाडीतून मोरगाव- चौफुला रोडवर तपासणी करत असावेत. ग्रामीण पोलिसांकडून वाहनचालकांना कुठल्याही स्वरूपाचा आर्थिक अथवा मानसिक त्रास दिला जात नाही.
– सोमनाथ लांडे, सहायक पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे