1 जानेवारीच्या अनुषंगाने 404 जणांवर शिक्रापूर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई
शिक्रापूर – कोरेगाव भीमा तसेच पेरणे येथे दरवर्षी 1 जानेवारी रोजी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून आठ ते दहा लाख समाजबांधव येतात. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीतील 404 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मिलिंद एकबोटेंसह 70 जणांना कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक व सणसवाडी परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अजूनही काही लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.
1 जानेवारी रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांची सुरक्षतता, नियोजनाची जबाबदारी पुणे ग्रामीण पोलीस दलावर आहे. परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक नागरिक, पोलीस मित्र, ग्रामपंचायत, अनेक उद्योजक रहदारी नियोजनासाठी मदत करतात. परिसरात सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरविणे, जातीय भावना दुखावणे आदी लोकांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक शेलार यांनी सांगितले.
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 404 जणांवर प्रतिबंधक कारवाई नोटीस बजावण्यात आल्या आहेत. परिसरात बंदी मनाई आदेश देण्यात आलेल्या व्यक्तींना दि. 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2020 पर्यंत परिसरात येण्यास बंदी घालण्यात आलेल्या आहेत. इतरही बहुतांश लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा आणि पेरणे फाटा परिसरात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू राहणार आहेत. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे 1 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दररोज परिसराची माहिती घेत आहेत. शिक्रापूर पोलीस, पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा जवान प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष देत आहेत. नागरिकांनी व मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या समाजबांधवांनी सोशल मीडिया तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नये, अशा काही अफवा आल्यास तत्काळ 9860272123 व 02137286333 या नंबरवर संपर्क साधावा.
– सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर