नगर – मध्यरात्रीच्या सुमारास नगरच्या मार्केटयार्ड भागातील धान्य बाजारात हिरालाल चोपडा यांच्या दुकानास आग लागली. त्यावेळी तेथून पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस पथकाने ती पाहिल्याने रात्री मोठा अनर्थ टळला.
मध्यरात्रीच्या सुमारास या भागातन पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना एका दुकानातून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांन तातडीने गेटवरील सुरक्षा रक्षकांना याची कल्पना दिली. सुरक्षा रक्षकांनी तातडीने तिथे धाव घेऊन गाळ्याचे मालक चोपडा यांना बोलावून घेतले. रात्रीच्या सुमारास नगरच्या अग्निशमन विभागास त्यांनी फोन केले. तथापि, तेथून बराचवेळ प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस मोठ्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली गेली.
येथील सर्वच दुकानांना प्लायवुडचे पार्टीशन आहे. त्यामुळे एका दुकानात लागलेली आग भडकल्यास ती संपूर्ण मार्केट भस्मसात करु शकेल, अशी स्थिती आहे. रात्री शॉट सर्किटमुळेच ही आग लागली असावी, असा संशय आहे.
दरम्यान, आज आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. माजी नगरसेवक संजय चोपडा यांच्या निकटवर्तीयंचा हा गाळा आहे. बाजार समिती संचालक राजेंद्र बोथरा व व्यापाऱ्यांनीही याची पाहणी करुन भविष्यात असे अनर्थ होणार नाहीत, अशी काळजी घेण्याविषयी व्यापाऱ्यांना सूचित केले.