बेल्हे -राज्य शासनाने शिथिल करून दारू दुकाने उघडण्याची परवानगी दिल्यानंतर दारू खरेदीसाठी आळेफाटा (ता. जुन्नर) येथे सोमवारी (दि. 4) तळीरामांची झुंबड उडाली. पोलिसांना पाचारण केल्याने अनर्थ टळला.
आळेफाटा येथील एका वाईन शॉपमध्ये मुबलक दारू उपलब्ध असल्याची आणि वाईन शॉप उघडल्याची माहिती तळीरामांना मिळाली. त्यांनी दारू खरेदीसाठी एकच गर्दी केली. दारू खरेदीसाठी आलेल्या तळीरामाच्या गर्दीमुळे दुकानदाराला नियम आणि अटी पाळणे अवघड झाले.
त्यांनी तळीरामाना नियम आणि अटी पाळण्याबाबत विनंती केली, पण तळीरामानी त्यांच्या सूचनांकडे काणाडोळा करत दारू खरेदीसाठी आग्रह धरला.
अखेर दुकानदाराने आळेफाटा पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांना दूरध्वनीवरून माहिती देऊन संरक्षण मागितले. पोलीस पथक घटनास्थळी दाखल होताच तळीरामानी पळ काढला, त्यामुळे अनर्थ टळला.