पुणे – शहरातील विविध भागात घरफोडी करत दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे. यावेळी चोरट्यांच्या ताब्यातून 20 ग्रॅम सोन्याचे गंठण, एक गॅस सिलेंडर, चोरीच्या चार दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
जितसिंग ऊर्फ जितु राजपाससिंग टाक (वय.23,रा. वैदवाडी हडपसर) आणि हुकुमसिंग रामसिंग कल्याणी (वय.28,रा.रामटेकडी हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील जितू टाक हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, घरफोडीच्या एका गुन्ह्यात पोलीस त्याच्या मागावर होते. हडपसर कॉलनी परिसरात दोन व्यक्ती चोरी करण्याच्या हेतूने अंधारात पाहणी करत एका दुचाकीवर थांबले आहेत. त्यानुसार पोलिसांनी हटकले असता, दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी दोघांनाही पोलिसांनी पाठलाग करून पकडले.