पुणे – थर्टीफर्स्टच्या रात्र विनाअपघात विनागालबोट पार पडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. योग्य ते नियोजन, नाकाबंदी आणि कडक बंदोबस्तामुळे कुठेही अपघाताची घटना घडली नाही. तर दुसरीकडे साडेचारशे तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मोहिमेत पोलिसांनी एकूण 1 हजार तळीरामांवर कारवाई केली आहे.
वाहतूक विभागाने सर्वत्र नाकाबंदी केली होती. मद्यपानकरून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. थर्टीफर्स्टच्या रात्री शहरात 61 अधिकाऱ्यांसह 648 कर्मचाऱ्यांची फौज वेगवेगळ्या सव्वाशे स्पॉटवर थांबविण्यात आली होती.
पोलिसांनी रात्री 460 मद्यपी वाहनचालकांना पकडले. त्यांची वाहने जप्त केली आहेत. तर, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता या मद्यपी वाहनचालकांना त्यांचे चारित्र्य पडताळणी तसेच नोकरीसाठी मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागणार आहे.
202 जणांवर पिंपरीत कारवाई
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या 202 तळीरामांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली. सर्वाधिक कारवाई भोसरीत तर, सर्वात कमी चाकण पोलिसांच्या हद्दीत झाली. दरम्यान, मागील वर्षी हा आकडा 127 होता.
कारवाईतील वाहनांचे प्रकार
पोलिसांनी रात्रीत एकूण 460 “ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह’च्या कारवाई केल्या आहेत. त्यात दुचाकी चालकांचा सर्वाधिक समावेश असून, 314 जणांना पकडले आहे. तर, 24 तीनचाकी तसेच, 122 कारचालकांना मद्यपानकरून वाहने चालविताना पकडण्यात आले आहे.