पुणे : अनावश्यक लोकांना पेट्रोल दिल्याप्रकरणी शहरातील 19 पेट्रोल पंपचालकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच जे पंपचालक संचारबंदीच्या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी ज्या अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून वगळले आहे. अशा अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतरांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंपचालकांवर गुन्हा दाखल करण्यात येऊ लागला आहे. सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.
“अनावश्यक लोकांना पेट्रोल विक्री करण्यास नियमानुसार बंदी घातली आहे. मात्र लोकांना पेट्रोल मिळत असल्याने ते वाहने घेऊन रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहने बंद व्हावीत, आदेश डावलून पेट्रोल विक्री करणार्या पेट्रोल पंपचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही कारवाई सुरु राहणार आहे”. – अशोक मोरावले
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदीच्या कालावधीत बाहेर पडू नये यासाठी जिल्हाधिकार्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना पेट्रोल देण्यास बंदी घातली आहे. परंतू असे असताना काही पेट्रोल पंपचालक अनेकांना गुपचूप पेट्रोल विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील वाहनांची गर्दी कमी होत नव्हती.
त्यावर गुन्हे शाखेने शहरात पेट्रोल पंपावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्यात काही पेट्रोल पंपचालक अनावश्यक लोकांना पेट्रोलची विक्री करताना दिसून आले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत परिमंडळ 1,परिमंडळ 2,परिमंडळ 3, परिमंडळ 4, परिमंडळ 5 यातील या पंपावर ही कारवाई करण्यात आली आहे.