ठोसेघर – जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील फुलोत्सवाचा यंदाचा हंगाम साधारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु, त्यापूर्वी वन विभाग व कास पठार कार्यकारी समितीकडून पावसाळी पर्यटन निसर्ग भ्रमंती करणाऱ्यांसाठी कास परिसरातील इतर निसर्गरम्य पॉईंट खुले करण्यात येणार आहे. एक ऑगस्टपासून त्यासाठी प्रति व्यक्ती तीस रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.
सातारा वन विभाग व कास पठार कार्यकारी समितीच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय नुकताच घेण्यात आला. यावेळी मेढा वनपरिक्षेत्र अधिकारी परदेशी, समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. कास पठार व आसपासचा परिसर म्हणजे निसर्गाचा खजिना आहे. या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य, जैवविविधता, पठारावर विशिष्ट हंगामात उमलणाऱ्या दुर्मिळ जाती, प्रजातींची फुले, वनस्पती, जीव,जंतू यामुळे कास पठार देशभराह विदेशी पर्यटकांचेही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या या परिसरात फुलोत्सवाव्यतिरिक्त इतर हंगामातही अनुभवण्यासारखी अनेक प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांच्या अद्यापही दृष्टिक्षेपात आलेली नाही. हा दुर्लक्षित निसर्गरम्य परिसर उलगडण्याचे नियोजन वन विभाग व कास पठार कार्यकारी समिती गेल्या काही काळापासून प्रयत्नशील आहे.
याअंतर्गत कास पठाराच्या विस्तीर्ण पठारावरील अनेक दुर्लक्षित निसर्गरम्य पॉईंट्स असलेल्या मंडपघळ, प्राचीन गुहा, कुमुदिनी तलाव, लाकडी मनोऱ्यावरून दिसणारे कास तलावाचे विहंगम दृश्य, सज्जनगड पॉईंट, नैसर्गिक तलाव, छोटे छोटे धबधबे इत्यादी निसर्गाची विलोभनीय किमया अनुभवण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. यासाठी आगाऊ बुकिंग करण्याची आवश्यकता नसणार आहे.
परंतु, फुलांच्या हंगामामध्ये ज्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश शुल्क घेऊन सोडले जाते. त्या ठिकाणी मात्र या कालावधीमध्ये प्रवेशास मज्जाव असणार आहे.
कास परिसर दर्शन सेवाही होणार सुरू
गेल्या वर्षी हंगाम कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेली कास परिसर दर्शन सेवा यावर्षी सुरू करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कास दर्शन सफारी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या सेवेमध्ये जवळजवळ 50 किलोमीटरचा प्रवास असून त्यासाठी समितीने खरेदी केलेल्या दोन महिंद्रा कंपनीच्या गाड्यांचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक गाडीमागे चार हजार रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार असून गाडीमध्ये आठ पर्यटकांना बसण्याची संधी आहे. ही सेवा कास पठार ते घाटाई देवराई- वांजुळवाडी मार्गे कास तलाव, तांबी इथून वजराई धबधब्याचे मनमोहक रुप पाहिल्यानंतर परत अंधारी, सह्याद्री नगरच्या पवनचक्क्या, त्यानंतर वेणा नदीचं विहमंग दृश्य बघून एकीव धबधबा, अटाळीच्या नवरा नवरी डोंगराला भेट देऊन परत कास पठाराच्या दिशेने सुरू राहणार आहे. लवकरच ही सेवा पर्यटकांसाठी खुली होईल, अशी माहिती समितीच्यावतीने देण्यात आली आहे.