पुणे –सिंहगड आणि शिवनेरी किल्ल्यांच्या पाठोपाठ आता तोरणा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत बस धावणार आहे. सध्या धावणाऱ्या कात्रज ते विंझर या बसचा वेल्ह्यापर्यंत विस्तार करण्यात येणार असून, गुरूवारपासून (24 फेब्रुवारी) कात्रज ते वेल्हा या मार्गावर बस धावणार आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली.
उत्पन्न वाढण्याच्या हेतूने पीएमपीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दींबाहेर बससेवा सुरू केली आहे. सध्या शहराबाहेरील सुमारे 85 मार्गांवर बससेवा सुरू आहे. नुकतीच पीएमपीने शिवनेरी किल्ल्यापर्यंत बससेवा सुरू केली. त्यापाठोपाठ आता कात्रज ते वेल्हा या मार्गावर पाच बसेसच्या फेऱ्या होणार आहेत.
याबाबत “प्रभात’ने वृत्त देखील प्रसिद्ध केले होते. मात्र, हा प्रस्ताव लालफितीत अडकला होता. नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आदींना फायदा होणार आहे. मात्र, याचा एसटीला मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे.