चऱ्होली – करोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे सर्व कामे ठप्प असल्याने आधीच आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली व त्यात भर पडली ती मोबाइल हरवल्याची! अशा दुहेरी संकटात सापडलेल्या प्रवाशाला भोसरीतील सदगुरुनगर आगारामधील चालक व वाहक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आला. अंदाजे बारा हजार रुपये किमतीचा बसमध्ये हरवलेला मोबाइल परत मिळाल्याने प्रवाशांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
भोसरी बीआरटी बसस्थानकामधून सकाळी भोसरी ते हिंजवडी बस मार्गस्थ झाली. या वेळी बसमध्ये राजेंद्र दत्तात्रय भांगरे, मु. पो. राजगुरूनगर बसमधून प्रवास करीत होते. नंतर ते नाशिकफाटा येथे उतरले. मात्र उतरताना त्यांचा मोबाइल बसमध्ये राहिल्याचे त्यांच्या लक्षात येताच चिंतेत भर पडली. त्यामुळे भांगरे यांनी नाशिकफाट्यज्ञवरून परत भोसरी बीआरटी बसस्थानकात येऊन तेथील अधिकारी काळुराम लांडगे, सुरेश बनसोडे यांना मोबाइल हरविल्याचे सांगितले.
प्रवाशाला धीर देत लांडगे यांनी बसचे वाहक कर्मचारी संदीप नारायण भगत व चालक विठ्ठल कांताराम थिगळे ह्या दोघांशी फोन करून संपर्क केला. तेव्हा मोबाइल सुरक्षित असून ताब्यात घेतल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. नंतर वाहक-चालक भोसरी स्थानकात आले असता तेथील अधिकारी यांच्याकडे मोबाइल जमा केला तेव्हा स्थानक प्रमुखांनी त्या मोबाइलची व प्रवाशाची कागदपत्रे व ओळख पटवून त्यांच्याकडे मोबाइल सुपूर्द केला. मोबाइल मिळाल्याने त्याने वाहक-चालक तसेच अधिकारी यांचे
आभार मानले.