‘पंतप्रधानांनी चीनला फायदा होईल अशी वक्तव्य करू नये’

नवी दिल्ली – लडाखच्या सीमेवर चीनसोबत झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. मोदी सरकारने चीनला चोख प्रत्युत्तर द्यावे, अन्यथा तो जनादेशाचा ऐतिहासिक विश्वासघात ठरेल, असा सल्ला मनमोहन सिंह यांनी पंतपधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे दिला आहे.

मनमोहन सिंह म्हणाले कि, १५-१६ जून रोजी गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले. या साहसी जवानांनी प्राणांची आहुती दिली. देशातील या सुपुत्रांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशाचे रक्षण केले. या सर्वोच्च त्यागासाठी आम्ही साहसी जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कृतज्ञ आहोत, परंतु आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये,  असे त्यांनी म्हंटले आहे.

आपण सध्या इतिहासाच्या नाजूक वळणावर आहोत. आपल्या सरकारचे निर्णय आणि पावलांवर भावी पिढ्या आपले मूल्यांकन कसे करतील, हे अवलंबून आहे. जे देशाचं नेतृत्व करत आहेत, त्यांच्या खांद्यावर कर्तव्याची मोठी जबाबदारी आहे. आपल्या लोकशाहीत ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे. पंतप्रधानांनी आपले शब्द आणि घोषणा करताना देशाची सुरक्षा आणि जागतिक हितसंबंधांवर होणाऱ्या परिणामांविषयी नेहमीच सावधगिरी बाळगली पाहिजे, असेही मनमोहन सिंह यांनी सांगितले.

एप्रिलपासून चीनने अनेक वेळा गलवान व्हॅली आणि पॅनगाँग त्सो लेक भागात घुसखोरी केली आहे. आपण चीनच्या धमकी आणि दबावासमोर झुकायचे नाही. आणि प्रादेशिक अखंडतेशी कोणतीही तडजोड आम्ही करणार नाही. पंतप्रधानांनी आपल्या वक्तव्यांनी षडयंत्री भूमिकांना बळ दिले नाही पाहिजे.

भ्रामक प्रचार कधीच कूटनीती किंवा मजबूत नेतृत्वाला पर्याय ठरु शकत नाहीत. पंतप्रधान आणि केंद्र सरकारकडे आम्ही आग्रह करतो, की त्यांनी वेळेच्या कसोटीचा सामना करावा आणि ‘राष्ट्रीय सुरक्षा’ तसेच ‘भूभागीय अखंडते’साठी प्राणांची आहुती देणाऱ्या कर्नल बी. संतोष बाबू आणि जवानांच्या बलिदानाच्या कसोटीला सामोरे जावे. यापेक्षा कमी काहीही केल्यास तो जनादेशाचा ऐतिहासिक विश्वासघात ठरेल’ असा इशारा मनमोहन सिंह यांनी दिला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत, असे वक्तव्य केल्याने विरोधक आक्रमक झाले असून टीका करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.