– धीरेंद्र गायकवाड
पुणे/कात्रज – पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीची सेवा सुरू झाली असली, तरी करोना हॉटस्पॉट असणाऱ्या पुण्यात ही सेवा तातडीने सुरू करण्याचा प्रशासनाचा कोणताही विचार नाही. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी सुरू करता येईल याचा निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पीएमपीने सोमवारपासून पिंपरी-चिंचवडमध्ये सेवा सुरू केली आहे. प्रायोगिक तत्वावर सध्या 80 बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुण्यात बसेस धावू लागतील, अशी आशा होती. पण पुणेकरांची ही आशा फोल ठरणार आहे.
रोज निरनिराळ्या ठिकाणी करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. ज्या भागात रूग्ण सापडतो, तो भाग त्वरीत सील केला जातो. त्यामुळे येथील सर्व रस्ते बंद करण्यात येतात. त्याचबरोबर पुण्यातील नाना पेठ, भवानी पेठ, येरवडा या भागात सर्व रस्ते बंद आहेत. त्यामुळे वाहतुकीचे मार्ग सुद्धा ठरविणे अवघड जाणार आहे.
पीएमपी सुरू केल्यावर बसमध्ये कशी व्यवस्था असेल, याचे नियोजन केले आहे. प्रत्येक बसमध्ये 21 प्रवासी बसतील. खिडकीमध्ये त्याच्याशेजारील सीट रिकामी ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर बस रस्त्यावर येण्यापूर्वी सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात येणार आहे. लॉकडाऊननंतरही पुढील सहा महिने अशाच प्रकारे काळजी घेण्यात येणार आहे. प्रवाशांसाठीचे नियोजन झाले असले तरी सेवा सुरू करण्याबाबतचा निर्णय दि.1जूननंतरच घेतला जाईल.
– अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल