लोणी काळभोर – महामार्गावर थांबलेला ट्रक पुढे जाण्याची वाट पाहत असणाऱ्या पीएमपी बसला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एसटीने धडक दिली. एसटी अचानक थांबल्यामुळे पाठीमागून आलेली कार धडकली. चार गाड्यांच्या या विचित्र अपघातात एसटीमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक वगळता तीनही गाड्यांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी पीएमपीएमएल चालक विश्वनाथ गारडी (वय 35, सध्या रा. सातववाडी) यांनी फिर्याद दिली आहे. एसटीचालक चालक मच्छिंद्र खांडेकर (रा. येवती, जि. उस्मानाबाद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात शनिवारी (दि. 21) सकाळी सोरतापवाडी (ता. हवेली) हद्दीत घडला. अपघातात एसटीमधील प्रवासी सुरेखा यादव (वय 50, रा. गुरसुळी, ता करमाळा, जि. सोलापूर), रावसाहेब जाधव (वय 90, रा. साकत, जि. उस्मानाबाद) शहाजी भोसले (वय 62, रा. बोरीबेल, ता. दौंड) हे गंभीर जखमी झाले तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
हडपसर-ऊरूळी कांचन ही पीएमपीएमएल बस घेऊन चालक गारडी हे हडपसर, मांजरी, लोणीकाळभोर, कुंजीरवाडीमार्गे सोरतापवाडी हद्दीतील आली. समोर एक ट्रक थांबला होता. म्हणून गारडी यांनी बस ट्रकमागे थोडे अंतर राखून उभी केली. याचवेळी मागून भरधाव आलेल्या एसटीने धडक दिली. त्यामुळे समोर थांबलेल्या ट्रकला धडकला. एसटी अचानक थांबल्यामुळे मागून आलेली कारही मागून धडकली. लोकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.