नारायणगाव – येथील पोलिसांनी नाशिकहून पुण्याकडे जात असलेल्या 35 ते 40 लाखांचा पानमसाला आणि गुटखा असलेला ट्रक वारूळवाडी (ता. जुन्नर) हद्दीत पकडला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
पुणे ग्रामीण दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना मिळाली. गुप्त माहितीनुसार आज दुपारी दीडच्या सुमारास नाशिककडून पुण्याकडे एक पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा 1109 ट्रक (एमएच 04 एफजे 8460) हा पान मसाला, गुटखा घेऊन जात आहे. या मिळालेल्या माहितीच्या आधारे ट्रक पकडून कारवाईसाठी मोहिते यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना संपर्क करून माहिती दिली.
त्यानुसार घोडे पाटील यांनी तात्काळ पुणे नाशिक महामार्गावर वारूळवाडी हद्दीत सापळा रचून हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर पुणे-नाशिक हायवे रोडवर पकडला. या ट्रकमध्ये विमल, माणिकचंद आदी कंपनीचा अंदाजे 35 ते 40 लाखांचा पानमसाला, गुटखा आढळून आला आहे. ट्रक चालक रमेश बाजमहादूर सिंग (रा. नाशिक) आणि किन्नर याला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाईसाठी पुणे अन्न व औषध प्रशासन विभागांना माहिती कळविले आहे.
त्यानुसार रविवारी (दि. 22) नारायणगाव येथे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन हरिबा मोहिते, पोलीस नाईक भीमा लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश गारगोटे यांनी केली आहे.