नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सलग 12 व्या दिवशीही सुरूच आहे. दोन्ही देश एकमेकांसमोर झुकायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत अनेक देश सलोखा घडवण्यासाठी पुढे येत आहेत. त्याच अनुषंगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी सुमारे 35 मिनिटे फोनवर चर्चा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. दोघांमध्ये फोनवर सुमारे 35 मिनिटे संभाषण झाल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढल्याबद्दल झेलेन्स्की यांचे आभार मानले. रशियासोबत सुरू असलेल्या युद्धाबाबतही पंतप्रधानांनी झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. युक्रेनमधील सुमी येथे अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी त्यांनी केलेल्या ऑपरेशनबद्दल बोलल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सध्या 500 हून अधिक भारतीय सुमीमध्ये अडकले आहेत.