न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धावर मोठे वक्तव्य केले आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या प्रशासनाला अजब सल्ला दिला आहे. अमेरिकेने एफ-२२ लढाऊ विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बॉम्ब टाकावेत असा सल्ला दिला आहे. यानंतर चीनने हे केलं सांगून आपण फक्त मागे बसून त्यांच्यातील भांडण पाहत राहायचं असेही यावेळी ट्रम्प म्हणाले.रिपब्लिकन राष्ट्रीय समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, “ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर प्रेक्षक हसत टाळ्या वाजवत होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेनस्की यांच्यासोबत झालेल्या झुम बैठकीतल्या फोटोंचे स्क्रीनशॉट तसेच बेजबाबदार वक्तव्यांमुळे आधीच रिपब्लिकनवर टीका होत असताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे.
ट्रम्प यांनी यावेळी नाटोचा पेपरवरील वाघ असा उल्लेख करत, “नेमक्या कोणत्या मुद्द्यावरुन देश आम्ही मानवतेविरुद्धचा हा मोठा गुन्हा स्वीकारू शकत नाही? आम्ही ते होऊ देऊ शकत नाही. आम्ही ते होऊ देऊ शकत नाही असे म्हणत आहेत”.
“बायडन यांनी असं वक्तव्य करणं थांबवावं आणि हे प्रत्येकाने ऐकावं. रशिया एक अणुशक्ती असणारा देश असल्याने आपण त्यांच्यावर हल्ला करणार नाही..बरोबर ना?,” असे ट्रम्प म्हणाले असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. “हे कोण म्हणतंय तुम्हाला माहिती आहे? मग हे तथ्य असो किंवा आभास असो. आपण रशियावर हल्ला करणार नाही. तो अणुशक्ती असणारा देश आहे” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर ट्रम्प यांनी पुतीन यांची प्रशंसा केली होती. मात्र यामुळे रिपब्लिकनने नाराजी जाहीर केली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलली असून आता बायडन यांच्यावर हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. याआधी बोलताना ट्रम्प यांनी २१ व्या शतकात आपण एकमेव राष्ट्राध्यक्ष राहिलो आहोत जेव्हा रशियाने कोणत्याही देशावर आक्रमण केलं नाही असं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “बुश असताना जॉर्जिया, ओबामा असताना क्रीमिया आणि बायडन असताना रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केलं,” असे ते म्हणाले होते.