शिमला – पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. तो रोड शो हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यात 31 मे यादिवशी होईल.
मोदी सरकारची आठवी वर्षपूर्ती दिमाखात साजरी करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यासाठी पक्षाकडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अशात मोदींचा सहभाग असणाऱ्या रोड शोचे महत्व वाढले आहे. त्या रोड शोनंतर मोदींची सभा होईल. हिमाचलमध्ये भाजपची सत्ता आहे. त्या राज्यात चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. ती निवडणूक विचारात घेऊन भाजपने मोदींच्या रोड शोसाठी शिमल्याची निवड केल्याचे मानले जाते.
तिथे होणाऱ्या सभेच्या माध्यमातून मोदी हिमाचलमधील आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ करतील. त्या राज्याची सत्ता राखण्याचा निर्धार भाजपने केला आहे. यावेळी त्या पक्षाला कॉंग्रेसकडून कडवी लढत दिली जाण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षानेही रिंगणात उतरण्याची तयारी केल्याने हिमाचलमधील राजकीय वातावरण आतापासूनच ढवळून निघाले आहे.