अहमदाबाद – लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यातील शतकवीर रजत पाटीदारने ( Rajat Patidar ) आपला फॉर्म कायम ठेवताना यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या क्वॉलिफायर 2 लढतीत दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळेच रॉयल चॅलेंजर बेंगळुरूला मर्यादित 20 षटकांत 8 बाद 157 अशी दिलासादायक मजल मारता आली.
Backing our bowlers to #PlayBold and defend this. 💪🏻
You got this, boys! 🙌🏻#WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #PlayOffs #RRvRCB pic.twitter.com/Ifw2JbQlnX
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 27, 2022
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकत बेंगळुरूला पहिल्यांदा फलंदाजी दिली. भरात आलेला विराट कोहली या सामन्यात मात्र एक षटकार फटकावून 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार फाफ डुप्लेसीने पाटीदारला साथ देत संघाचे अर्धशतक फलकावर लावले.
डुप्लेसी स्थिरावलेला असतानाही अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 25 धावांची खेळी केली. त्यावेळी पाटीदारने आपले अर्धशतक साकार केले. त्याला साथ देत ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक फलंदाजी केली. मात्र, तोदेखील वेगाने धावा जमवण्याच्या प्रयत्नात 13 चेंडूत 1 चौकार व 2 षटकार फटकावून 24 धावांवर बाद झाला. मात्र, त्यापूर्वी या जोडीने संघाचे शतक फलकावर लावले.
जोमात फलंदाजी करत असताना पाटीदारचाही संयम सुटला व तो 58 धावांवर बाद झाला. त्याने 42 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी केली. त्यानंतर मात्र दिनेश कार्तिकच्या वेगवान 12 धावांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात जबाबदारीने फलंदाजी केली नाही. राजस्थानच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी त्यांचे फलंदाज बाद केल्याने त्यांना दीडशतकी धावांच्या पुढे मोठी मजल मारता आली नाही. राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा व ओबेद मकॉय यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 8 बाद 157 धावा. (रजत पाटीदार 58, फाफ डुप्लेसी 25, ग्लेन मॅक्सवेल 24, दिनेश कार्तिक 12, प्रसिद्ध कृष्णा 3-22 ओबेद मकॉय 3-23).