नवी दिल्ली – पुण्याजवळील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) उभारले जाण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
येथील सीजीओ कॉम्प्लेक्समधील सीईजी सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रशेखर यांनी रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारले जाईल. तसेच सीडॅकच्या वतीने इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्पही महाराष्ट्रात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली.
चंद्रशेखर म्हणाले, रांजणगाव (फेस-3) येथील होऊ घातलेल्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) मुळे येत्या काळात जवळपास 5 हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पाठपुरावा केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ईएमसीच्या प्रकल्प विकासासाठी एकूण 492.85 कोटी रुपये अंदाजित खर्च येणार असून 207.98 कोटी रुपये केंद्र सरकार, तर 284.87 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे गुंतविले जातील. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक भविष्यात आकर्षित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकल्पांतर्गत अँकर क्लायंट मेसर्स आयएफबी रेफ्रिजरेशन मर्या.ने या ठिकाणी 40 हजार एकर जमीन घेतली असून या कंपनीने सुमारे 450 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. यासह 297.11 एकर जमिनीपैकी 200 एकर जमीन विविध इलेक्ट्रॉनिक औद्योगिक समूहांना वाटप केली जाईल. याठिकाणी इलेक्ट्रॉनिक उत्पादन आणि त्याशी निगडीत साखळी विकसित केली जाईल. पुढील 32 महिन्यांमध्ये येथील पायाभूत सुविधा पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तामिळनाडू, कर्नाटक, नोएडा, तिरूपती या चार ठिकाणी ईएमसी प्रकल्प आहेत. आता महाराष्ट्रातही असा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने आता रांजणगाव हा परिसर इलेक्ट्रॉनिक हब म्हणून ओळखले जाईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केली.
सी-डॅकच्या माध्यमातून प्रकल्प उभारणार
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, इंडिया (सी-डॅक) ही संस्था पुण्यात आहे. या संस्थेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंगचा एक प्रकल्पही महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती चंद्रशेखर यांनी दिली. या प्रकल्पाची किंमत साधारण 1 हजार कोटी रुपये असणार आहे. पुढील काळात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी रोड शोचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.