प्लेसिसने पटकाविली ऑरेंज कॅप

नवी दिल्ली  -आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने हैदराबादवर 7 विकेट्‌सने सहज विजय मिळविला. हैदराबादने दिलेले 172 धावांचे लक्ष्य चेन्नईने 18.3 षटकांतच गाठले. यात सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या 75 धावा आणि फाफ डू प्लेसिसच्या 56 धावा निर्णायक ठरल्या.

या खेळीसह प्लेसिसने अर्धशतकासह एक विशेष कामगिरीदेखील केली. त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दिल्लीच्या शिखर धवनला मागे टाकत अव्वल स्थान गाठले. त्यामुळे आता ऑरेंज कॅपची शर्यत अजूनच चुरशीची झाली आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या प्लेसिसने हैदराबादच्या विरोधातील सामन्यात 56 धावांची खेळी करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान गाठले. त्याच्या आता 6 सामन्यांत 270 धावा आहेत. त्याने मागे टाकल्याने शिखर धवन दुसऱ्या स्थानी घसरला असून त्याच्या 6 सामन्यांत 265 धावा आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल असून त्याच्या 6 सामन्यांत 240 धावा आहेत.

चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर परदेशी खेळाडूंनी कब्जा केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ग्लेन मॅक्‍सवेल 6 सामन्यातील 223 धावांसह चौथ्या स्थानी आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरिस्टोदेखील 6 सामन्यांत 218 धावांसह पाचव्या स्थानावर आहे. या पाचही फलंदाजांमधील धावांचे अंतर कमी असल्याने आगामी सामन्यांनुसार यात सातत्याने बदल पाहायला मिळतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.