मुंबई -संपूर्ण देश सध्या करोना महामारीचा सामना करत आहे. या करोनाविरुद्ध लढाईमध्ये जगभरातून भारताला मदत मिळत आहे. आयपीएल फ्रॅंचायझी राजस्थान रॉयल्सने या लढाईसाठी 7.5 कोटींची मदत देण्याची घोषणा केली आहे. याबाबत राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
राजस्थान रॉयल्सकडून कोविड-19ने प्रभावित झालेल्या लोकांना तत्काळ मदत देण्यासाठी मालक, खेळाडू आणि मॅनेजमेंटच्या मार्फत 1 मिलियन डॉलर म्हणजेच 7.5 कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत राजस्थान रॉयल्स फाउंडेशन आणि ब्रिटिश एशियन ट्रस्टकडून देण्यात येईल. या कसोटीप्रसंगी राजस्थान टीममधील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ भारतासोबत आहेत, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीदेखील भारताच्या मदतीसाठी धावला आहे. ब्रेट लीने भारतातल्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी 1 बिटकॉईन म्हणजेच जवळपास 42 लाख रुपये दिले आहेत. याआधी कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू पॅट कमिन्सनेही 50 हजार डॉलर म्हणजे जवळपास 37 लाख रुपये पीएम केअर्स फंडसाठी दिले आहेत.