सातारा- जिल्ह्यातील करोनामुक्त महिलेला आज घरी सोडण्यात येणार आहे. तसेच ३९ संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर नवीन १८ संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या ४५ वर्षीय कोविड-19 बाधित महिलेचा चौदा दिवसानंतरचा दुसरा नमुन्याचा रिपोर्ट काल रात्री उशिरा निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. ही महिला कोविडी-19 या आजारातून पूर्णपणे बरी झाली आहे, असे जाहीर करुन तिला आज ८ एप्रिल रोजी रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात ६ एप्रिल रोजी रात्री उशिरा दाखल असलेल्या ३२ संशयित रुग्णांचे व दि. ७ एप्रिल रोजी कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेल्या ७ अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे पुण्यातील एन.आय.व्ही. संस्थेने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
जिल्हा रुग्णालयात १ ते ६० वर्ष वयोगटातील १८ नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये १ ते ५५ वयोगटातील पाच नागरिक (दोन पुरुष व तीन महिला) हे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतुसंसर्गामुळे व २० ते ६० वर्ष वयोगटातील १३ नागरिक कोविड-१९ बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील आहेत. या सर्व रुग्णांचे घशातील स्त्रावाचा नमुने एन. आय. व्ही. कडे पाठविण्यात आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.