पोखरी घाटात भाविकांच्या जीवाशी खेळ

पावसामुळे दरड कोसळण्याची शक्‍यता

तळेघर  – मंचर-भीमाशंकर मार्गावरील अरुंद व नागमोडी वळणाचा पोखरी घाट सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पावसामुळे कोसळलेल्या दरडी, डोंगराचा खचलेला भाग यामुळे घाटात अपघाताची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यातच भर म्हणून घाट मार्गातील खराब रस्ते, दरड कोसळल्यामुळे बुजलेली गटार लाइन, रस्त्यावर वाहणारे पाणी यामुळे पोखरी घाटातील प्रवास भाविकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

पोखरी घाट हा वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक ज्योतीर्लिंग आहे आणि भीमाशंकरला जाण्यासाठी मंचर-भीमाशंकर हा एकेरी मार्ग आहे. तसेच भाविकांना पोखरी घाट पार करावा लागतो. घाटात आतापर्यंत पाच ते सहा वेळा दरड कोसळली आहे. अजूनही दरडीचा राडारोडा घाटात पडून आहे. यामुळे रस्त्यावर लहान-मोठे दगड, माती पडल्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे दुचाकीवरुन घसरून पडण्याचे प्रकार रोजच घडत आहेत.

डोंगराचा काही भाग खचल्यामुळे एखादी मोठी दरड कोसळून भयंकर अनर्थ घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त प्रश्‍न ग्रामस्थ विचारत आहेत. श्रावण महिना काही दिवसांवर आल्यामुळे भीमाशंकरला भाविक-भक्त व पर्यटकांची अहोरात्र वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पोखरी घाटाची पाहणी करून धोकादायक दरडी व कोसळलेल्या दरडीचा राडारोडा हटवावा, अशी मागणी स्थानिक वाहनचालकांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.