नवी दिल्ली -चीनमधील हांगझॉऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कुस्तीची निवड चाचणी ऑगस्टमध्ये खेळवावी, अशी मागणी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणऱ्या कुस्तीपटूंनी केली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडे मुदतवाढीचा हा प्रस्ताव ठेवला. 15 जुलै ही निवड चाचणीची अखेरची तारीख होती.
आशियाई परिषदेकडे अंतिम संघाची यादी 15 जुलैपर्यंत सादर करणे भारतीय संघटनेला बंधनकारक आहे. त्यानुसार त्यांनी सर्व राष्ट्रीय फेडरेशनला त्यांच्या त्यांच्या खेळातील नावे 30 जूनपर्यंत आपल्याकडे देण्याची सूचना केली आहे.
ब्रिजभूषण यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये समावेश असलेल्या बजरंग पुनियाला आशियाई स्पर्धेत खेळायचे आहे. मात्र, दीर्घ काळ चाललेल्या या आंदोलनामुळे त्यांना सराव आणि व्यायाम करता आलेला नाही. या कुस्तीपटूंनी निवड चाचणीसाठी मुदवाढ देण्याकरिता क्रीडा उपसचिव एसपीएस तोमर यांना पत्र लिहिले होते.
त्यानंतर क्रीडा खात्याने हे पत्र सध्या भारतीय कुस्ती संघटनेचा हंगामी कारभार सांभाळणाऱ्या समितीकडे पाठवले. कुस्तीपटूंनी मागणी केलेले पत्र आम्हाला मिळाले आहे. यावर आशियाई परिषदेचे काय मत येते याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.
त्यांनी परवानगी दिली तर चाचणी स्पर्धेला आम्ही मुदतवाढ देऊ, असे भारतीय समितीने सांगितले आहे. हांगझॉऊ येथे यंदाची आशियाई स्पर्धा येत्या 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.