इंदापुरात टाळ-मृदंगांचा गजर : नगर परिषदेचा उपक्रम
रेडा- इंदापूर नगरपरिषदेकडून “स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाअंतर्गत प्लॅस्टिकमुक्त शहर करण्यासाठी व स्वच्छतेचे संदेश देण्यासाठी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल व नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे कर्मचारी, नागरिक, महिला, व्यापारी, स्वयंसेवी संस्था, बचत गटांच्या सहभागातून टाळ-मृदुंगासह इंदापूर शहरात स्वच्छतेची दिंडी अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते.
शहरातील नागरिकांनी जागोजागी दिंडीचे स्वागत करीत स्वच्छतेच्या उपक्रमाचे कौतुक केले. दिंडीमध्ये विविध अभंग, उखाणे, भोंडल स्वरूपात स्वच्छतेची जनजागृती करण्यात आली. “प्लॅस्टिक मी वापरणार नाही’ अशा नागरिकांनी घातलेल्या टोप्या लोकांचे लक्ष वेधत होत्या. दिंडीमध्ये स्वच्छता, प्लॅस्टिक बंदी याविषयी जनजागृती केली होती. नेहरू चौकामध्ये नगराध्यक्षा शहा आणि मुकुंद शहा यांनी फुगडी खेळून या दिंडीतला सहभाग द्विगुणीत केला होता. यावेळी अनेक कर्मचारी, नागरिकांनी फुगडीमध्ये सहभाग नोंदवला. शहरात सकाळी पारंपरिक उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.दिंडीतील सहभागी लोक स्वच्छतेचा संदेश देत होते.