पिंपरी – पर्यावरणचा दिवसेंदिवस होणारा ऱ्हास रोखण्यासाठी एकदाच वापर (सिंगल यूज) होणाऱ्या प्लॅस्टिक वस्तूंवरील बंदीची 1 जुलैपासून कडक अंमलबजावणी करण्याचे केंद्र सरकारने आदेश दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात सिंगल यूज प्लॅस्टिक वापर करणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे. बंदी घातलेले प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी आठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 16 ग्रीन मार्शल पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने आता बॅन सिंगल-यूज प्लॅस्टिक मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत सिंगल-यूज प्लॅस्टिकपासून तयार होणाऱ्या 19 वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. या वस्तूंमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, स्ट्रॉ, काटे-चमचे, कप, ग्लास आणि प्लेट आदींचा समावेश आहे. या वस्तू वापरायच्या की नाही असा पर्याय आता दुकानदारांकडे किंवा हॉटेल व्यावसायिकांकडे नाही. या वस्तूंवर पूर्णपणे बंदी असणार आहे. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्या दुकान किंवा हॉटेलचे लायसन्सदेखील रद्द होऊ शकते. प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर यापूर्वीच बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारने आता बॅन सिंगल-यूज प्लॅस्टिक मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने शहराच्या आठही क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत जनजागृती आणि कारवाईसाठी 16 ग्रीन मार्शल पथकाची नेमणूक केली आहे.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार शहरात सिंगल यूज प्लास्टिक बंदीची मोहीम राबविण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी, नागरिकांनी बंदी घातलेले सिंगल यूज प्लास्टिक वापर करण्याचे टाळावे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांची ती जबाबदारी आहे. महापालिकेच्या वतीने प्लॅस्टिक बंदीबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही बंदी घातलेले प्लॅस्टिक वापरल्यास दंडात्मक आणि कडक कारवाई करण्यात येणार आहे.
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
हे वापरता येणार नाही
इअरबड, प्लॅस्टिकचे झंडे, फुग्यांचे प्लॅस्टिक स्टिक्स, कॅन्डी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, थर्मोकोल, प्लॅस्टिकच्या प्लेटस्, कप, ग्लास, काटा, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या डब्यावर वापरला जाणारा प्लास्टिक पेपर, निमंत्रण पत्रिका, सिगारेट पाकिटांच्या पॅकिंगसाठी वापरला जाणारा कागद आणि 100 मायक्रॉनपेक्षा कमी प्लॅस्टिक किंवा पीव्हीसीचे बॅनर आदींचा एकदा वापरातील प्लॅस्टिकच्या वस्तूंचा समावेश आहे.