नवी दिल्ली – मोदी सरकारने पियूष गोयल यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांना राज्यसभेचे सभागृह नेते करण्यात आले आहे. थावरचंद गेहलोत यांच्या जागी त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
गेहलोत यांना नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळातून निरोप देऊन त्यांच्याकडे कर्नाटकच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 57 वर्षीय गोयल हे राज्यसभेचे उपनेते म्हणून काम पाहात होते. गोयल हे सन 2010 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत.
गोयल यांच्याकडील रेल्वेखाते काढून घेण्यात आले असले तरी त्यांना वस्त्रोद्योग या खात्याचा अतिरिक्त अधिभार सोपवण्यात आला आहे. त्यातच त्यांच्याकडे ही सभागृह नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने गोयल यांचे महत्त्व वाढले आहे. तथापि,गोयल हे अर्थमंत्रीपदासाठी अधिक उत्त्सुक होते असे सांगण्यात येते.