पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) –स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दि. 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध ठिकाणी “प्लॉगेथॉन मोहीम” (विशेष स्वच्छता मोहिम) राबविण्यात येणार आहे.
आपल्या देशाप्रती असलेला सेवाभाव, स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा झालेले क्रांतीकारक, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन आणि स्वातंत्र्याचा जागर करण्यासाठी केंद्रसरकार आणि राज्यशासनाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामध्ये घरोघरी तिरंगा उपक्रमासह रक्तदान शिबिर, व्याख्यानमाला, ग्रंथोत्सव, प्रभातफेरी, “प्लॉगेथॉन” मोहीम आदी उपक्रमांचा समावेश आहे.
शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी दि. 12 रोजी अ आणि फ क्षेत्रीय कार्यालय, दि. 13 रोजी ब आणि ग क्षेत्रीय कार्यालय, 14 रोजी ड आणि इ क्षेत्रीय कार्यालय तर 15 ऑगस्ट रोजी क आणि ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, घरोघरी तिरंगा, स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती बाबत जनजागृती करण्यासाठी डिजिटल चित्ररथाचा वापर करण्यात येणार असून शाळा कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्था, नागरिक आणि संघटनांनी सहभागी होऊन अमृत महोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.