पुणे, दि. 5 -पुण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पर्यावरणपूरक इ-बसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक सुरू केली आहे; पण आता या ई-बसच्या चार्जिंगसाठी लागणारा वीजपुरवठा महावितरणकडून पीएमपीला मिळत नसल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर यासंदर्भात आम्हाला पीएमपी प्रशासनाने जास्तीच्या वीजपुरवठ्याची मागणी केली नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यातून पीएमपी प्रशासन आणि महावितरण यांच्यातील समन्यवयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यात पर्यावरण पूरक आणि सक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी पीएमपीने इलक्ट्रिक बस सुरू केल्या. त्यानुसार पाचशे इलक्ट्रिक बस घेण्याचे नियोजन करण्यात आले. आतापर्यंत शहरात ई-बस सुरू झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरात वाहतूक सेवा सुरू आहे. शहरात सध्या भेकराईनगर, निगडी, बाणेर, वाघोली आणि पुणे स्टेशन येथे चार्जिंग डेपो आहेत. या ठिकाणी इलक्ट्रिक बस चार्जिंग केल्या जातात. भविष्यात आणखी ई-बस येणार आहेत; पण त्यासाठी पुरेशी चार्जिंगची सोय नाही. सध्या सुरू केलेल्या पाच डेपोपैकी तीन डेपोला पुरेशा वीजपुरवठा मिळत नसल्याचे पीएमपीकडून सांगण्यात आले.
शहरातील सर्वांत जास्त मोठा असलेल्या भेकराईनगर येथे डेपोमध्ये सर्वाधिक बस चार्जिंग केल्या जातात. या ठिकाणी मागणीप्रमाणे वीजपुरवठा मिळत आहे. पुणे, पुणे स्टेशन, वाघोली आणि बाणेर येथे अद्यापही मागणीप्रमाणे वीजपुरवठा मिळालेला नाही. या तीन डेपोमध्ये मागणी केलेल्यांपैकी निम्मा देखील वीजपुरवठा मिळत नाही. त्यामुळे पीएमपीकडून वीजपुरवठा वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.
आम्ही महावितरणकडे जास्तीच्या वीजपुरवठ्याची मागणी केली असून, महावितरणकडून अजूनही जास्तीचा पुरवठा दिला जात नसल्याने पीएमपीच्या तीन इ-चार्जिंग स्टेशनला अडचणीचा सामना करावा लागत आहे.
-दत्तात्रये झेंडे, वाहतूक व्यवस्थापक