कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली इमारत धूळखात पडून
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने मासुळकर कॉलनी येथे नेत्र रुग्णालय उभारण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी घेतला होता. सद्यःस्थितीत मासुळकर कॉलनी येथे रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे. प्रत्यक्षात रुग्णालय अद्यापही सुरू झालेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून इमारत बांधल्यानंतरही हे रुग्णालय सुरू करण्यास उशीर का केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने वायसीएम रूग्णालयावर दिवसेंदिवस ताण वाढत आहे. हा ताण लक्षात घेता महापालिकेच्या वतीने नवीन भोसरी रुग्णालय, नवीन आकुर्डी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, थेरगाव रुग्णालय या रुग्णालयांमध्ये 24 तास रुग्ण सेवा सुरू करण्याचा निर्णय एक महिन्यापुर्वीच घेतला आहे. ही चारही रुग्णालय नव्याने बांधण्यात आली आहेत. तर नेत्र रूग्णालयाचीही इमारत बांधून तयार असल्याने यंदा नेत्र रूग्णालय सुरू होण्याची शक्यता होती. परंतू, अद्याप याबाबतचा निर्णय झालेला नाही.
रूग्णालय सुरू करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर मिळत नाहीत. साहित्य आणि मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे, असे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे. रूग्णालय कधी सुरू होणार? यावर वैद्यकीय विभागातील कोणीही अधिकारी बोलायला तयार नाही.
शहरात कोरोनाचे संकट मार्च 2020 मध्ये सुरू झाले. त्यावेळी नेत्र रूग्णालयाच्या इमारतीचे काही काम शिल्लक होते. यानंतर उर्वरित काम करण्यात आले आहे. मात्र, रुग्णालय सुरू करण्यात आलेले नाही. केवळ करोनाचे लसीकरण या ठिकाणी सुरू असून उर्वरित संपूर्ण इमारत धुळखात पडून आहे.
खासगी संस्थेला देण्याचा घाट?
रुग्णालयाची इमारत बांधून तयार आहे. महापालिकेने रूग्णालय न चालवता खासगी संस्थेला चालण्यासाठी देण्याचा विचार सुरू आहे. परंतु, यामुळे शहरातील रुग्णांना योग्य सुविधा मिळेल का? कमी पैशात उपचार मिळतील का? असा प्रश्न आहे. खासगी संस्थेला रूग्णालय चालविण्यासाठी देण्याचा घाट सुरु असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून भाजपच्या काही सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी खासगीकरणाचा डाव साधायचा असल्याचा आरोपही होत आहे.
डोळ्यांचे उपचार महागडे; सर्वसामान्यांसाठी नेत्र रुग्णालय गरजेचे
करोना महामारीमुळे अनेक नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या समस्या सुरू झाल्या आहेत. डोळ्यांचे उपचार सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. फक्त डोळे तपासणीसाठी नेत्रतज्ज्ञ चारशे ते पाचशे रुपये घेतात. तर डोळ्यांचा आजार झाल्यास त्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये मोठा खर्च येतो. हा खर्च अनेकांना परवडत नाही. महापालिकेचे रुग्णालय सुरू झाल्यास शहरातील सामान्य नागरिकांना याचा लाभ होणार आहे.