पुणे-ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नवीन समर्पित आयोग स्थापन केला असून या आयोगाकडून माहिती जमा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार समर्पित आयोगाने ग्रामपंचायतींकडून 1960 ते 1994 या कालावधीत निवडलेल्या सदस्यांची माहिती मागविली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींकडून मागील दोन दिवसांपासून ही माहिती देण्याचे काम सुरू आहे.
आयोगाने मागविलेली माहिती कशी सादर करायची याबाबतचे प्रशिक्षण विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांना देण्यात आले आहे. ग्रामसेवकांकडून ही माहिती भरण्याचे काम सुरू आहे. यामध्ये ग्रामपंचायतीची स्थापना, निवडणूक कधी झाली, एकूण वॉर्ड, आरक्षण काय होते, निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव, पत्ता, जातीचा प्रवर्ग, राजकीय पक्ष आणि नमूद केलेल्या माहितीचा स्रोत काय याची माहिती ग्रामपंचायतींकडून गोषवाऱ्यात नमूद करावयाची आहे.
संबंधित विस्तार अधिकारी यांनी त्यांच कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतीच्या माहितीची तपासणी करावी. त्यापैकी
10 टक्के ग्रामपंचायतीच्या माहितीची स्वतः तपासणी करावी. ही माहिती अत्यंत तातडीने सादर करावयाची असल्याने विषयाचे गांभार्य लक्षात घेता माहिती गोषबाऱ्यासह स्वाक्षरीने सादर करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेकडून विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.