प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या कारभाराचा फटका
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 35 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यास होतो. शासनाकडून अनुदान प्राप्त झाले असूनही समग्र शिक्षा अभियानाच्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या तीन महिन्यांपासून झाला नाही. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. महापालिका प्रशासनाच्या “लेट लतीफ’ कारभारामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत वेतन न मिळाल्यास अनुदान पुन्हा शासनाकडे वर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरात समग्र शिक्षा अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्यामार्फत हे कामकाज चालते. याअंतर्गत शहरात आकुर्डी आणि पिंपरी येथे यांचे शहर साधन केंद्र आहे. तर 2006 पासून 35 कर्मचारी कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर
कार्यरत आहेत. यामध्ये विशेष शिक्षक, विशेष साधनव्यक्ती, वरिष्ठ लेखापाल, डाटा इंन्ट्री ऑपरेटर आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. हे कर्मचारी शहरातील सर्व मान्यता प्राप्त शाळा, अनुदानित, विना अनुदानित, महापालिकेच्या शाळेत गुणवत्ता वाढीसाठी कामकाज, शाळांमध्ये चर्चासत्रे, मार्गदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन केले जाते.
या कंत्राटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून वेतन अदा केले जाते. त्यांचे वेतन महापालिकेच्या माध्यमिक विभागाकडे वेळच्या वेळी जमा केले जाते. तीन महिन्यांचे वेतनाची रक्कम महापालिकेकडे जमा झाले आहे. मात्र, शासनाने पीएफएमएस (पब्लिक फायनाशियल मॅनेजमेंन्ट सिस्टम) या प्रणाली अंतर्गत या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन होणार होते. ही प्रणाली नवीन असल्याने तांत्रिक अडचण येत आहे. मात्र, नवीन प्रणालीमुळे थोडाफार उशीर मान्य आहे. मात्र, तीन महिने झाले तरी वेतन नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांपुढे आर्थिक अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे.
पुढील महिन्यात गुढीपाडवा हा महत्वाचा सण असल्यामुळे त्यापूर्वी वेतन व्हावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. समग्र शिक्षा अभियानाचा पदभार महापालिकेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याकडेच असतो. या विभागाचा पदभार माध्यमिक विभागाकडे देण्यात आला आहे. माध्यमिक विभागाचे अधिकारी या अभियानाचा पदभार हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याकडेच असतो, असे सांगत आहेत. या वादाचा फटका सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना बसत आहे. त्यामुळेच या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासूनचे वेतन रखडले आहे.
सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांचे जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांचे वेतन काही तांत्रिक कारणामुळे थकीत आहे. ही तांत्रिक समस्या दूर झाली असून येत्या दोन दिवसांत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन जमा होईल.
– संदीप खोत, उपायुक्त, शिक्षण विभाग