पुणे- महापालिकेकडून शहरात दरवर्षी जवळपास 1 हजार ते 1500 कोटींची भांडवली तसेच देखभाल दुरूस्तीची कामे केली जातात. ही कामे करताना त्यांची एकत्रित नोंद नसल्याने या कामांमध्ये अनेक गैरप्रकार केले जातात तसेच एकच काम वारंवार केले जाते, अशा चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कामांना आळा घालण्यासाठी येत्या दि. 1 एप्रीलपासून महापालिकेच्या कामाकाजात “कामकाज व्यवस्थापन प्रणाली’ (वर्क मॅनेजमेंट सिस्टीम) राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत प्रत्येक कामाची नोंद जीपीएसवर केली जाणार आहे. प्रत्येक कामाचे स्वतंत्र रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. या कामांमध्ये क्षेत्रीय कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या कामांसह, पथ विभाग, बांधकाम विभाग, ड्रेनेज विभाग, विद्युत विभाग, भवन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, यांच्यासह स्थापत्य विषयक केल्या जाणाऱ्या प्रत्येक कामाचा समावेश आहे. तसेच या कामांची माहिती नागरिकांनाही पालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार असून या कामांबाबत आपला अभिप्राय नोंदविता येणार आहे. तर या प्रणालीचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण पालिकेच्या सर्व अभियंत्यांना 4 ते 8 एप्रील दरम्यान देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
अशी आहे “कामकाज व्यवस्थापन प्रणाली’…
पालिकेच्या प्रत्येक विकासकामाची नोंद या ऑनलाइन प्रणालीमध्ये असणार आहे. उदा. एखाद्या रस्त्याचे काम करायचे असल्याच पथ विभागास त्या कामाचे ठिकाण जीपीएस प्रणालीद्वारे निश्चित करावे लागेल. त्यानंतर रस्त्याची लांबी-रूंदी द्यावी लागेल तसेच काम डांबरीकरण आहे की कॉंक्रीटचे ते नमूद करावे लागेल. तसेच इतर आवश्यक माहिती या प्रणाली भरल्यानंतर जे डीएसआर निश्चित केलेले असतील त्यानुसार, संगणकीकृत पूर्वगणक पत्र निविदांसाठी तयार होईल. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होतानाचे आणि फोटो आणि काम झाल्यावरच्या फोटोसह काम देण्यात आलेला ठेकेदार, कामाची मुदत, कामाचा डिफेक्ट लायबिलीटी पिरियडची माहिती प्रणालीत भरली जाईल. त्यामुळे पुढे ही माहीती लॉक होईल. त्यानंतर पुन्हा याच जागेवर मुदत संपण्या आधीच काम प्रस्तावित केल्यास या कामाची निविदा निघणार नाही. तर संबधित कामासाठी काही आपातकालीन स्थिती उद्भवल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच त्याबाबत प्रत्यक्ष स्थिती लक्षात घेऊन काम करण्याचा निर्णय घेता येईल. हीच पध्दत इतर सर्व विभागांच्या कामासाठी असणार आहे.
दुबार कामांना बसणार आळा…
सध्या महापालिकेत अनेक विकासकामे प्रत्येक वर्षी केली जातात. त्यात, रस्त्यांचे डांबरीकरण, पदपथ करणे, पथदिवे बसविणे, ड्रेनेज टाकणे, पाण्याच्या लाइन टाकणे अशी कामे केली जातात. मात्र, संबधित जागेच्या ठिकाणी हे काम झालेले असल्यास प्रशासनास लगेचच संबधित कामाची माहिती मिळणार आहे. त्यामुळे दुबार कामे टाळता येणार आहेत. या शिवाय, आता प्रत्यक्ष जीपीएसवर कामाचे ठिकाण दर्शविणे अभियंत्यांना बंधनकारक असणार आहे.