- वाहतूक नियमानाऐवजी टार्गेटवर भर ः पूर्वी होता शिट्टीचा धाक
पिंपरी – काही वर्षांपूर्वी पोलिसांची शिट्टी वाजली की वाहन चालक असो किंवा सराईत गुन्हेगार यांची पाचावर धारण बसत असे. पूर्वी चौका-चौकात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शिट्टीचा वापर होत असे. मात्र आता ही पोलिसांची शिट्टी काही केल्या वाजताना दिसत नाही.
पिंपरी चिंचवड शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यानुसार शहरातील वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरमुळे शहरातील अनेक चौक सिग्नल फ्री झाले आहेत. त्यामुळे चौका-चौकातील वाहतूक पोलिसांच्या शिट्ट्यांचा आवाज आता संपुष्टात आला आहे. पूर्वी रात्रगस्तीसाठी आलेले पोलीस गल्ली बोळात शिट्टी मारून आपण जागृत असल्याचे एकप्रकारे सांगत असत. पोलिसांची शिट्टी ऐकून चोरटेही पळ काढत असे. पूर्वी बहुतांश चौकात वाहतूक नियंत्रक दिवे नसल्याने वाहतूक पोलीसच शिट्टी वाजवून वाहन चालकांना “जायचे की थांबायचे’ सांगत असे.
शहराचा विकास होत गेल्याने आता चौकाचौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसले आहेत. यामुळे चौकाच्या मध्यभागी उभे राहण्याची वाहतूक पोलिसांची सवय आता मोडली गेली आहे. वाहतूक पोलीस सिग्नलच्या एका बाजूला कोपऱ्यात उभे राहून आपले सावज शोधताना दिसतात. याच पोलिसांनी जर चौकात उभे राहून शिट्टीचा वापर केल्यास वाहतुकीचे नियम वाहन चालक मोडणार नाहीत. मात्र तसे केल्यास वरिष्ठांनी दिलेले कारवाईच्या रकमेचे टार्गेट कसे पूर्ण करणार, असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडतो.
शिट्टीचा गैरवापर
काळ बदलत गेला तसा पोलिसांच्या शिट्टीचा गैरवापरही वाढत गेला. आता गल्लोगल्ली येणारी कचऱ्याच्या गाडीतूनही शिट्टीचा आवाज येऊ लागला आहे. सध्या वाहतूक पोलीस जरी शिट्टीचा वापर करीत नसले तरी त्यांचे खासगी वसूलीवाले मात्र या शिट्टीचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडून पैसे घ्यायचे असल्यास त्यांना ते शिट्टी मारून बाजूला घेतात. पोलिसांप्रमाणे हे वसुलीवाले देखील खाकी पॅन्ट घालत असल्याने त्याचा पोलिसांप्रमाणे दरारा असतो. मात्र पोलिसांनी आपल्या शिट्टीकडे असेच दुर्लक्ष केले तर काही दिवसांनी पोलिसांच्या गणवेशातून ही शिट्टी गायब झाल्यास आश्चर्य वाटायला नको.