महापालिका मोहिमेचा वेग मंदावला; दुकानदारांचे फावले
पिंपरी – पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असतानाही दुकानदारांकडून या पिशव्यांचा वापर सर्रास सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. महापालिकेने याविरूद्ध विशेष मोहीम राबविली होती. मात्र, सध्या या मोहिमेचा वेग मंदावला आहे. त्यामुळे दुकानदारांचे फावले आहे.
राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी पूर्णत: प्लास्टिक बंदी केली. प्लास्टिक पिशव्यांबरोबरच प्लास्टिक फुले, प्लास्टिकचे बॅनर्स, प्लास्टिकचे झेंडे, पॉट्स, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदींचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याशिवाय, थर्माकोलच्या उत्पादनांवरही बंदी घालण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून सजावटीसाठी करण्यात येणारा थर्माकोलचा वापर कमी झाला.
सध्या दुकानदारांकडून नागरिकांना सुटे खाद्यपदार्थ देताना सर्रास प्लास्टिक पिशव्या दिल्या जात आहेत. भाजी विक्रेते, किराणा दुकानदार व अन्य खाद्यपदार्थ विक्रेते या पिशव्यांचा वापर करीत असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांविरूद्ध महापालिका प्रशासनाने मध्यंतरी विशेष मोहीम राबविली होती. अशा दुकानदारांकडून दंड वसुली करण्यात येत होती. मात्र, सध्या या मोहिमेचा वेग मंदावला आहे. पर्यायाने, दुकानदारांना मोकळे रान मिळाले आहे.
प्लास्टिक विक्रेत्यांवर कडक कारवाईची गरज
राज्यात प्लास्टिक बंदी असल्याने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांवर प्रथम कारवाईचा बडगा उगारायला हवा. या पिशव्या बाजारपेठेत विकल्याच गेल्या नाही तर किरकोळ विक्रेत्यांकडे पोचणार नाहीत. पर्यायाने, पिशव्यांचा वापर वाढणार नाही. सध्या आता व्यवहारामध्ये कापडी पिशव्या सहजपणे मिळू शकतात. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांना अटकाव करणे शक्य आहे.
“वर्क फ्रॉम होम’मुळे प्लॅस्टिक कचऱ्यात वाढ
करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता विविध कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी “वर्क फ्रॉम होम’चा पर्याय खुला ठेवला आहे. विशेषत: आयटी कंपन्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे घरातुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्लास्टिक कचरा वाढत आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांची “होम डिलिव्हरी’ मागविण्याकडेही बऱ्याच जणांचा कल वाढला आहे. त्यामुळे “होम डिलिव्हरी’सोबत येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या टाळणे अशक्य झाले आहे. त्याशिवाय, घरगुती स्वरुपातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी प्लास्टिक चमचे, डिश, डबे आदींच्या वापरातही वाढ झाली आहे.