जुनी सांगवी, (वार्ताहर) – रावेत-औंध मार्गावर जगताप डेअरी ते सांगवी फाटा रस्त्याचे तसेच पदपथाचे नव्याने नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, जिल्हा रुग्णालय प्रवेशद्वारात पदपथाचे काम रखडल्याने रुग्ण तसेच नातेवाइकांना ये-जा करताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील पदपथाचे त्वरित काम करून घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच खडी, सिमेंट, वाळू तसेच राडारोडा पडलेला आहे. त्यामुळे इतर मार्ग चांगला असून देखील पादचार्यांची वाट मात्र बिकट झाली आहे. रुग्णालयात येणारे ज्येष्ठ नागरिक व त्यांचे नातेवाईक या राडारोड्यात अडकून पडण्याचा धोका आहे. पदपथावर ठिकठिकाणी पेव्हिंग ब्लॉकचे ठोकळे तसेच लोखंडी खांब पडले आहेत.
औंध मुख्य रस्त्यावरून रुग्णालयाकडे जाणारा सेवारस्ता सुरू होतो त्याच ठिकाणी खडी पडली आहे. चेंबरची कामे अर्धवट ठेवली आहेत. पथदिव्याचा खांबसुद्धा धोकादायक ठरत आहे.रात्रीच्या वेळेस येथून मार्गस्थ होताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. येथील पदपथावर प्लॅस्टिकचे पाइप ठेवण्यात आल्याने पदपथावरून ये-जा करणे अडथळ्याची ठरत असल्याची भावना स्थानिक नागरिक एस. एन. कुंभार यांनी व्यक्त केली आहे.