पिंपरी-चिंचवड : गावरान आंब्यांचा दरवळ अंतिम टप्प्यात

हापूसला सर्वाधिक मागणी : केशर, रायवळला देखील खवय्यांची पसंती

गावरान जांभूळ देखील भाव खातयं

या बाजारात गावरान आंब्यांबरोबरच गावरान जांभळे देखील उपलब्ध आहेत. शंभर रुपये प्रतिकिलो दराने जांभळांची विक्री होत आहे. याशिवाय भीमाशंकरच्या परिसरात मिळणारा गावरान आवळा देखील भाव खात आहे. शहरवासियांच्या दृष्टीने हा रानमेवा पर्वणी ठरत आहे.

पिंपरी – खेडच्या पश्‍चिम पट्टयाबरोबरच आंबेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून अस्सल गावरान आंब्यांचा चव चाखण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भोसरीतील बीआरटीएस टर्मिनलशेजारी भरणाऱ्या या आंबा बाजारात अस्सल गावरान जातीचे आंबे पिंपरी-चिंचवडकरांना चाखायला मिळत आहेत. आता हा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पुढील आठ ते दहा दिवस हा हंगाम सुरू राहणार आहे.

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात नैसर्गिक विविधतेने नटलेल्या शुद्ध वातावरणातून आंबा व जांभूळ हा रानमेवा शहरात विक्रीस येत आहे. गेली एक तपापासून हा बाजार अखंडपणे पिंपरी-चिंचवडकरांच्या जीभेचे चोचले पुरवत आहे. आता हा बाजार पीएमपीएमएलच्या बीआरटीएस टर्मिनलमागे स्थिरावला आहे. आर्थिक गणितांनुसार आता शेतकरी सहसा डझनवर विक्री करण्याऐवजी किलोच्या भावात आंबे विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. या बाजारात अस्सल गावरान जातीचा रायवळ, हापूस आणि केशर उपलब्ध आहेत. अगदी साठ रुपये प्रति डझनला गोटी आंबा उपलब्ध आहेत. शंभर रुपयांना एक किलो, दीड किलो दराने हापूस व केशरची विक्री होत आहे.

खेडच्या पश्‍चिम पट्टयातील अनेक शेतकरी अर्थाजनासाठी आंबा विक्रीच्या जोडधंद्याचा मार्ग चोखाळत आहेत. मे महिन्यात सुरू होणारा हा हंगाम महिना-दीड महिना चालतो. या हंगामातील दीड महिन्यातच वर्षभरातील चांगले अर्थार्जन होत असल्याने, अनेक स्थानिक नागरिक देखील पश्‍चिम पट्ट्यातून याठिकाणी माल विक्रीसाठी आणत आहेत. त्याकरिता स्वतंत्र टेंपोंची व्यवस्था शेतकरी व विक्रेत्यांकडून केली जाते. सकाळी दहाच्या सुमारास दाखल झालेल्या विक्रेत्यांच्या मालावर खवय्यांच्या उड्या पडत आहेत. सायंकाळी सात-आठच्या सुमारास बहुतांशी विक्रेत्यांचा माल संपत असून, त्यानंतर हे सर्व विक्रेते परतीच्या प्रवासाला लागतात.

गावरान आंब्यांच्या विक्रीतून होणारे अर्थार्जन लक्षात आल्याने, अनेक शेतकरी व विक्रेते या जोडधंद्याकडे वळू लागल्याने अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पुण्यापेक्षा कमी अंतरावर भोसरीची हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने, दरवर्षी मालाची आवक वाढत आहे. शहराच्या विविध बागातून खवय्ये आंबा खरेदीसाठी भोसरीत येत आहेत.

“खेडच्या पश्‍चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांना गावरान आंबा विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. नैसर्गिकरित्या पिकविलेल्या आंब्याला ग्राहकांकडून दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. या जोडधंद्यामुळे आमच्यासारख्या शेतकऱ्यांना चांगला आधार मिळाला आहे.
– पापा शेख, आंबा उत्पादक शेतकरी, वाडा (खेड)

Leave A Reply

Your email address will not be published.