देहुरोड – पुण्याहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या धावत्या लोकलमधील दरवाज्यातून बाहेर डोकावणाऱ्या अनोळखी तरूण लोहमार्गालगतच्या खांबाला (क्र.167/35) धडकून पडल्याने जागीच मृत्यू झाला. देहुरोड, बापदेवनगर येथे शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या धावत्या लोकलमधील दरवाज्यातून बाहेर डोकावणाऱ्या तरुणाचे खांबावर डोके आदळले. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तरूणाचे अंदाजे वय 26, त्याच्या अंगावर पांढऱ्या उभ्या रेषेचा जांभळ्या रंगाचा फूल शर्ट, नेसणीस काळी पॅन्ट, उजव्या पायात काळा करगुटा, काळे केस, दाढी-मिशा ठेवलेली. त्याच्याजवळ शिवाजीनगर ते आकुर्डी प्रवासाचे तिकीट सापडले. काळी सॅक, बॅगेत कपडे आढळून आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस हवालदार एच. व्ही. बल्लाळ यांनी दिली.