- उपमुख्यमंत्री अजित यांनी व्यक्त केला विश्वास; तिकीट काढून प्रवास, कामाचा आढावाही घेतला
पिंपरी – सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वांत मोठा प्रकल्प असलेल्या पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) सकाळी सहा वाजता घेतला. मेट्रोच्या कामाबाबत समाधान व्यक्त करतानाच पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत मेट्रो लवकरच दाखल होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी अजित पवार यांनी मेट्रोची पाहणी करतानाच कामकाजाचाही आढावा घेतला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सादरीकरणाव्दारे पवार यांना माहिती दिली. शुक्रवारी (दि.18) सकाळी सहा वाजताच मेट्रोच्या फुगेवाडी येथील कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले. त्यानंतर त्यांनी पिंपरी येथे मेट्रोमध्ये बसून थोडासा प्रवासही केला.
तत्पूर्वी संत तुकारामनगरच्या मेट्रो स्थानकावर तिकीट काढून अद्यावत तिकीट यंत्रणेची तपासणी केली. मेट्रोचे सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी येथे उपस्थित होते. त्यांनी मेट्रोच्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला व कामाबद्दल समाधानही व्यक्त केले.
जून 2017 मध्ये शहरात मेट्रोचे काम सुरू झाले होते. त्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांनी मेट्रोच्या सर्व कामाची पाहणी करुन आढावा घेतला. मेट्रो पहिल्यांदा पिंपरी-चिंचवडमध्येच धावण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी मेट्रो पाहणीचा दौरा पिंपरी-चिंचवडमधूनच सुरू केला. पिंपरी-चिंचवडमध्ये सुरुवातीला प्रचंड वेगात सुरू असलेले मेट्रोचे काम करोनामुळे थांबले होते. त्यानंतर कामगार उपलब्ध होत नसल्याने मेट्रोचा वेग मंदावला होता. परंतु आता पुन्हा कामगार येऊ लागल्याने कामाचा वेग वाढत आहे. यावर उपमुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या.
पाहणीदरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील संत तुकारामनगर स्टेशन ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोतून प्रवास केला. मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, संचालक अतुल गाडगीळ, रामनाथ सुब्रमण्यम, मार्गिका एकचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे, जनसंपर्क विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत सोनावणे यावेळी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांची धावपळ
नियोजित दौऱ्याची पूर्वकल्पना असल्याने अजित पवार यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठी गर्दी करतात. मात्र, आजचा दौरा सकाळी सहा वाजताच सुरू झाल्याने, पदाधिकाऱ्यांना पिंपरीत पोहोचता आले नाही. तसेच अजित पवार यांच्या कार्यालयाकडूनही स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणतीच माहिती दिली नव्हती. त्यामुळे भल्या पहाटे राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी चांगलीच धावपळ झाल्याचे पहावयास मिळाले.
अर्थमंत्री नात्याने निधीची पूर्तता करू
आपल्या पाहणी दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, करोनामुळे संपूर्ण जगच थांबले होते. तसेच या प्रकल्पाचे कामही थांबले होते. परंतु आता पुन्हा सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवडकरांना लवकरात लवकर मेट्रोची सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील तसेच अर्थमंत्री या नात्याने महाराष्ट्र सरकारकडून मिळणारा निधी वेळीच उपलब्ध करुन देऊ जेणे करुन कामात अडथळा येणार नाही, याची काळजी घेतली जाईल.