पिंपरी – कोणतेही वाहने चालवताना मोबाइल वापरण्यावर बंदी आहे. तरीही हजारो वाहन चालकांकडून त्याकडे सर्रासपणे कानाडोळा केला जात आहे. यातून अपघाताचा धोका असून अशा वाहन चालकांना दंडदेखील आकारण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी गेल्या पाच वर्षांत एक लाख 39 हजार 577 वाहनचालकांवर कारवाई करीत पाच कोटी 73 लाख 88 हजार रुपयांचा दंड आकारला आहे.
अनेक दुचाकीस्वार वाहन चालविताना कानाला मोबाइल लावून मान वाकडी करून फोनवर बोलत असतात. त्यामुळे त्यांचे एकाचवेळी दोन्ही ठिकाणी लक्ष असते. काही वाहन चालक कानाला हेअरफोन लावून गाणी ऐकतात किंवा मोबाइलवर बोलतात. अशा चालकाची पाठीमागील वाहन चालकाने हॉर्न वाजविला तरी त्याची चिडचिड होते. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.
मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत घट
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 मध्ये सुरू झाले. त्यानंतर 2019 मध्ये मोबाइलवर बोलणाऱ्या तब्बल 57 हजार 109 वाहन चालकांवर कारवाई केली. मात्र त्यानंतरच्या कोणत्याच वर्षांत पोलिसांच्या कारवाईचा आकडा 23 हजारांवर गेला नाही. एकीकडे बेशिस्त वाहन चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मोबाइलवर बोलणाऱ्या वाहन चालकांची संख्या कमी कशी झाली, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वाहने चालवताना मोबाइलवर बोलण्यामुळे एकाग्रता भंग होते, अपघाताची शक्यता बळावते. अपघातामुळे स्वतःचाच नव्हे तर इतरांचाही जीव धोक्यात येतो. म्हणूनच वाहन चालविताना मोबाइल वापरास मनाई आहे. अशा वाहन चालकांवर यापुढील काळातही मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाणार आहे. – विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग
मोबाइल टॉकिंगप्रकरणी पाच वर्षांत वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई
वर्ष एकूण केसेस एकूण दंड
2018 13,827 27,64,800
2019 57,109 1,13,86,400
2020 19,773 3,954,000
2021 22,885 51,50,300
2022 15,602 2,02,94,500
2023 10,381 1,38,38,000
एकूण 1,39,577 5,73,88,000
वाहनाचा प्रकार पहिल्यांदा दंड (रुपयांमध्ये) दुसऱ्यांदा दंड (रुपयांमध्ये)
दुचाकी 1,000 10,000
चारचाकी 2,000 10,000
अवजड वाहन 4,000 10,000