पिंपरी – गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरातील सकाळी हवेमध्ये धूलिकण दिसत असून पूर्वी दवबिंदूंमुळे धुके पडल्यासारखे वातावरण आहे. मात्र, हवेत गारवा नाही, तर धूलिकणांनी हवा माखली असून शहरातील वायू प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिक ऑक्टोबर हिटचा अनुभव घेत असताना धूलिकणांचाही त्रास जाणवत आहे. हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले असून फुफ्फुस व शरीरातील इतर अवयवांसाठी ते घातक आहेत.
“सफर’ ऍपवर पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, निगडी, भूमकर चौक तसेच आळंदी या परिसरातील हवेच्या गुणवत्ते विषयी माहिती दिली जाते. त्यात आजच्या दिवशी सर्वाधिक प्रदूषित हवा ही निगडी येथील दर्शविण्यात आली आहे. आजच्या दिवसाचा एक्यूआय 285 आहे. 200 पेक्षा जास्त एक्यूआय (एयर क्वालिटी इंडेक्स) असणे म्हणजे प्रदुषणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात सतत वाढ होताना दिसत आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात 11 जानेवारी 2023 शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविण्यासाठी कृत्रिम फुफ्फुसे बसविली होती. ती महिनाभरातच काळी पडली होती. त्यातून शहराची गुणवत्ता किती ढासळत आहे, हे सिद्ध झाले होते.
हवेमध्ये प्रदूषक कणांची पातळी वाढली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, दम लागणे आदींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात वाहनांची प्रचंड संख्या वाढली आहे. त्यातून बारीक कण हवेत मिळत आहेत. तसेच बांधकाम क्षेत्रातील धुळही वाढत आहे. परिणामी सध्या प्रदूषित हवेचा श्वास नागरिक घेत आहेत.
विकासकामे ठरताहेत घातक
शहरात ठिकठिकाणी रस्ते दुरुस्ती व इतर कामांसाठी खोदकाम सुरूच असते. सातत्याने सुरू असलेल्या या कामांमुळे निर्माण होणारी धूळ आता त्रासदायक ठरु लागली आहे. त्याच प्रकारे शहरात अनेक ठिकाणी लहान-मोठ्या गृह व व्यावसायिक प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पांमधून देखील मोठ्या प्रमाणात हवेत घातक घटक मिसळले जात आहेत.
आजचा एक्यूआय
निगडी – 285
भोसरी – 160
भूमकर चौक – 195
पीएम 2.5 म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यदायी हवेचे जे निकष सांगितले आहेत, त्यामध्ये पुण्यातील हवा ही अत्यंत प्रदूषित आहे. पीएम 2.5 हे चारपट अधिक प्रदूषित असल्याचे दिसून येत आहे. पीएम 2.5 कण म्हणजे 2.5 मायक्रोन आकाराचे सूक्ष्म प्रदूषक कण. ते हवेत तरंगत सहजपणे श्वासातून माणसाच्या शरीरात जाऊ शकतात. त्यांचा आकार हा केसाच्या रुंदीपेक्षा चाळीसाव्या भागाइतका सूक्ष्म असतो. हे कण ओझोन, नायट्रोजन ऑक्सिड , कार्बन डिओक्सिड , सल्फर डिओक्सिड, नायट्रेट, धूळ यांचे असतात.