पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – शहरातील विविध भागात महापालिकेच्या वतीने विकास कामे केली जातात. मात्र, ही कामे मिळविण्यासाठी काही ठेकेदार तब्बल 30 ते 40 टक्यांने कमी दराने निविदा भरतात. त्यामुळे एवढ्या दरात ही कामे कशी शक्य झाली असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. आता अशा कामांचा दर्जावर थेट आयुक्तांनी शंका व्यक्त केली असून या कामांचा दर्जा तपासला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे गेल्या वर्षभरात 30 ते 40 टक्के कमी दराने निविदा भरून कामे मिळविणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणणार आहे हे मात्र निश्चित. मिळालेल्या माहितीनुसार 8 ते 10 कामांचा दर्जा तपासला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांची बदली झाल्यानंतर आयुक्त म्हणून शेखर सिंह दि. 17 ऑगस्ट रोजी रूजू झाले. त्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेऊन विभागात काय कामकाज सुरू आहे. तसेच त्यांनी नवीन काय करता येईल, याच्याही सूचना दिल्या आहेत. विभागाचा आढावा घेत असताना आयुक्त सिंह यांना विशेष करून स्थापत्य विभागाची कामे घेण्यासाठी काही कंत्राटदार तब्बल 30 ते 40 टक्के कमी दराने निविदा भरून काम मिळवत असल्याचे त्यांच्या निदर्शास आले. याबाबत संबंधित विभागाच्या प्रमुखांनाही त्यांनी याची विचारणा केली. विभाग प्रमुख कंत्राटदारांना काम परवडत असेल म्हणून घेत असतील, असे सांगितल्याची महापालिका वतुर्ळात चर्चा आहे. मात्र, एवढ्या कमी दराने काम घेऊन त्या कामाचा दर्जा, गुणवत्ता खरेच चांगली राहिल का? याची आयुक्त सिंह यांना खात्री वाटत नाही. त्यामुळे सिंह यांनी गेल्या वर्षभरात 30 ते 40 टक्के कमी दराने निविदा भरून काम मिळवणाऱ्या 8 ते 10 कंत्राटदाराच्या कामाचा दर्जा तपासा, त्या कामाची सर्व माहिती घ्या, असा आदेश दक्षता समितीला दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. आयुक्तांच्या या आदेशामुळे मात्र, संबंधित कंत्राटदाराचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. दरम्यान, या सर्व कामांचा दर्जा तपासून आयुक्त सिंह कंत्राटदारांवर काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.