पिंपरी, दि. 15 (प्रतिनिधी) – चार वर्षांपूर्वी सुमारे 35 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले सुसज्ज नेत्र रुग्णालय महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे धूळखात पडले आहे. आता रुग्णालयात मोड्युलर ओटी (मोड्युलर ऑपरेशन थिएटर) बांधण्यासाठी नव्याने खर्चाचा घाट घातला आहे. यामुळे नेत्र रुग्णालयावर महापालिका अनाठायी खर्च करत असल्याची बाब उजेडात आली आहे.
नेत्रहीन व्यक्तींना जगाचे सौंदर्य पाहण्यासाठी दृष्टी देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेने मासुळकर कॉलनी येथे टोलेजंग इमारत बांधून त्यामध्ये सुसज्ज नेत्र रुग्णालय सुरू केले. मात्र, महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नेत्र रुग्णालय अल्पावधीतच बंद पडले. त्याठिकाणी कोविड संक्रमणाच्या काळात कोविड टेस्टींग सेंटर व लसीकरण केंद्र सुरू केले. करोना आटोक्यात आल्यानंतर महापालिकेने 35 कोटी रुपये खर्च करुन तयार केलेल्या नेत्र रुग्णालयाचे अक्षरषः गोडाऊन बनविले आहे. जम्बो कोविड सेंटरमधील बेड्स, गाद्या, स्ट्रेचर आदींसह वैद्यकीय उपकरणे व फाइलींचे गठ्ठे ठेवण्यात आले आहेत. त्यावर धुळीचे लोट साचले आहेत. आता याच रुग्णालयातील मोड्युलर ओटी बांधण्याचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला आहे.
प्रभाग क्रमांक 9 मधील रुग्णालय इमारत व इमारतीच्या सुधारणा करण्यासाठी स्थापत्य विषयक कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासह नेत्र रुग्णालयातील मोड्युलर ओटी तयार करण्यासाठी 3 कोटी 32 लाख 11 हजार 198 एवढ्या रक्कमेची निविदा काढण्यात आली. प्राप्त निविदा धारकांनी दिलेल्या दरानुसार 13.10 टक्के कमी दराने निविदा भरलेल्या मे. ग्रीनलींग इन्फ्रा संस्थेला हे काम करण्यास अनुमती देण्याचे प्रस्तावित आहे. या कामासाठी ठेकेदाराला 180 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठीचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त 1 प्रदीप जांभळे पाटील यांनी आयुक्ता शेखर सिंह यांच्या अंतिम मान्यतेसाठी ठेवला आहे.
तरतूद 25 लाखांची अन् खर्च 3.32 कोटींचा
मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालयात स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी स्थापत्य विभागाकडील विशेष योजना लेखाशीर्षावर अवघ्या 25 लाखांची तरतूद शिल्लक आहे. एवढ्या कमी रक्कमेची तरतूद शिल्लक असताना वैद्यकीय विभागाने 3 कोटींचा खर्च काढला आहे. उपलब्ध तरतूद आणि खर्च याचा ताळमेळ जुळत नसल्याने याकामी येणारा खर्च भागवण्यासाठी अन्य लेखाशीर्षावरील उपलब्ध तरतूद वर्गीकरण खरुन हा खर्च भरुन काढावा लागणार आहे.