फलटण – प्राथमिक शिक्षक बॅंकेची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत असून सभासद परिवर्तन पॅनेलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सातारा, कराड येथील मेळाव्यात दिग्गजांनी सत्ताधाऱ्यांना सोडचिठ्ठी देत “परिवर्तन’ला साथ दिली. गिरवी- तरडगाव गटात अपक्ष उमेदवार नितीन करे यांनी सभासद परिवर्तन पॅनेलला जाहीर पाठिंबा दिल्याने परिवर्तन पॅनेलची ताकद आणखी वाढली आहे. फलटण तालुक्यातून परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना उच्चांकी मताधिक्य देण्यासाठी “कपबशी’च्या प्रचारात अनेक दिग्गज सहभागी होत आहेत, अशी माहिती शिक्षक संघाचे सरचिटणीस सुभाष ढालपे यांनी दिली.
शिक्षक बॅंक निवडणुकीच्या माध्यमातून संयमी व अभ्यासू नेत्यांनी माडलेल्या भूमिकेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. अनेकजण स्वयंस्फूर्तीने फलटण तालुक्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पॅनेलच्या प्रचारात सामील होऊ लागले आहेत. ज्येष्ठ शिक्षक नेते संभाजीराव थोरात, समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, दोंदे गटाचे नेते दीपक भुजबळ व मनोमिलनाचे प्रणेते बलवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभासद परिवर्तन पॅनलने जिल्ह्यात प्रचाराचा धडाका लावला असून पॅनेलच्या सर्व 21 उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत आहे. शिक्षक बॅंकेच्या माध्यमातून टोल नाका उभा करून सर्वसामान्य शिक्षकांच्या श्रमाच्या पैशाची लूट थांबविण्यासाठी चार वर्षातच शिक्षक सभासद सावध बनले आहेत.
बलवंत पाटील यांनी 2015 च्या निवडणुकीत यांनी चेअरमनपदाची धुरा सांभाळल्यावर तीन वर्षे त्यांच्या कारकिर्दीत पारदर्शक व स्वच्छ कारभार करून शिक्षक बॅंकेच्या प्रगतीचा आलेख उंचविला होता. याचा विसर काही सत्ताधारी नेत्यांना पडला. त्यांना जमिनीवर आणण्यासाठी सभासद पॅनेलच्या मांज्याने योग्य वेळी योग्य भूमिका घेतली आहे, असे उमेदवार शशिकांत सोनवलकर यांनी सांगितले.
सभासद पॅनेलच्या भूमिकेचे स्वागत करून अपक्ष उमेदवार नितीन करे यांनी सभासद परिवर्तन पॅनलचे उमेदवार राजेंद्र बोराटे यांना जाहीर पाठिंबा दिला. शिक्षक समितीचे नेते निलेश कर्वे यांनी फलटण गटाचे शशिकांत सोनवलकर यांच्या प्रचारात सहभागी होऊन परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार केल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे यांनी सांगितले.
यावेळी सतीश नलवडे, किरण यादव, सुरेंद्रकुमार घाडगे, भगवंतराव कदम, सोमनाथ लोखंडे, राजेंद्र सरक, संतोष कोळेकर, दिलीप मुळीक, सिकंदर शेख, आण्णा गावडे, रघुनाथ कुंभार, तानाजी वाघमोडे, नारायण सपकाळ, द. बा. पवार, आण्णासो शेवते, देवीदास मोरे, डी. के. कदम, श. ज्ञा. कांबळे, दिलीप मुळीक, डुबल, गणेश तांबे, तानाजी ढमाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, राजेंद्र बोराटे, उदय नाळे, नवनाथ धुमाळ, सोमनाथ लोखंडे यांनीही प्रचारानिमित्त माण, फलटण, कोरेगाव, खटाव, खंडाळा, वाई, सातारा तालुक्यातील विविध गावांतील शिक्षकांना सभासद परिवर्तन पॅनेलशी जोडण्यासाठी महत्वाची भूमिका घेतल्याने मतदारसंघात उत्स्फूर्तपणे पाठींबा मिळत असल्याचे चित्र आहे.
परिवर्तन पॅनेल 21-0 ने बाजी मारेल : उदय शिंदे
शिक्षक बॅंक निवडणुकीत जिल्ह्यातील सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार केल्यामुळे या निवडणुकीत त्यांना सभासद स्वीकारणार नाहीत, परिवर्तन पॅनेलच्या नेत्यांवर वैयक्तिक स्वरुपाचे आरोप होत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर सभासद मोठ्या प्रमाणात नाराज असल्याने या निवडणुकीत सभासद परिवर्तन पॅनेल 21- 0 ने नक्कीच विजयी होईल, असा ठाम विश्वास शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी व्यक्त केला.