पिंपरी, दि. 15 (प्रतिनिधी) – वाहतूक पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाईला सुरुवात केली आहे. शहरातील प्रमुख चौकांसह अगदी गल्ली बोळातील फुटेज पोलिसांना पाहता येत आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांनो तुम्ही सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्यापासून वाचू शकत नाही. तसेच कारवाई तीव्र करण्यासाठी आणखी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
दै. प्रभातच्या टीमने स्मार्ट सिटीच्या कार्यालयाला भेट देऊन कशा प्रकारे पोलीस कारवाई करतात, याची सखोल माहिती घेतली. चौकाचौकात लावलेल्या कॅमेऱ्याचे चित्र 30 बाय 20 फूटच्या स्क्रीनवर पहिले जाते. ही यंत्रणा खूपच अत्याधुनिक आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज इतके सुस्पष्ट आहेत की दुचाकीवरुन चालेल्या व्यक्तीच्या डोक्यावरील एखादा पांढरा केसही अगदी स्पष्टपणे दिसतो. आपण कॅमेऱ्याच्या कक्षात येणार नाही किंवा आलो तरी स्पष्ट दिसणार नाही, अशा भ्रमात वाहनचालकांनी राहू नये. तिसऱ्या डोळ्याची म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची स्पष्ट नजर तुमच्यावर आहे. हे लक्षात ठेवा.
अशी होत आहे कारवाई
स्मार्ट सिटीच्या नियंत्रण कक्षात मोठी स्क्रीन लावली आहे. शहरातील चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पोलीस पाहणी करतात. झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे उभे असलेल्या वाहनाचा फोटो कॅप्चर केला जातो. यामध्ये वाहनाचा क्रमांकही असतो. त्या फोटोच्या आधारे संबंधित वाहनावर कारवाई केली जाते. जर तुमच्या गाडीचा क्रमांक मोबाइलशी जोडलेला असेल तर तुम्हाला लगेच मेसेजद्वारे कारवाईची माहिती होईल. अन्यथा तुम्ही नियमभंग करीत राहाल आणि तुमच्या गाडीवर दंड वाढत जाईल. जर तपासणीमध्ये तुमचे वाहन पोलिसांनी अडविले तर सर्वच दंड तुमच्याकडून वसूल केला जाईल.
आकडेवारीवरून लक्षात येते कारवाईची व्याप्ती
सीसीटीव्ही द्वारे कारवाईची माहिती घेत असताना प्राधिकरणातील एका चौकाची माहिती घेतली असता त्या एका चौकात सीसीटीव्हीद्वारे तब्बल 7 हजार 360 वाहनांवर कारवाई केली. यातून जवळपास 44 लाख 99 हजार 720 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा आकडा फक्त एका चौकातील आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागांमधील चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे किती आणि कशी कारवाई होत असेल याचा अंदाज यावरून येतो.
गुन्हेगारीवरही वचक बसणार
शहरात सुमारे सात हजार कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अगदी गल्ली बोळातील माहितीही पोलिसांना बसल्याजागी मिळणार आहे. एखादा गुन्हा केल्यावर आरोपी कोणत्या वाहनातून कोणत्या मार्गाने कुठे गेला आहे, याचीही माहिती पोलिसांना मिळणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीवरही पोलिसांचे नियंत्रण येईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पहिली कारवाई पोलीस कर्मचाऱ्यावरच
सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे कारवाईला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी एका चारचाकी वाहनावर कारवाई केली. मात्र ते वाहन एका पोलिसाचेच होते. यामुळे त्या पोलिसाला दंड भरावा लागला. त्यामुळे कोणीही असला तरी त्यावर कारवाई होणारच, हेच यातून प्रकरणावरून समोर आले आहे.