पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलवर ससून रुग्णालयात उपचार करताना जाणीवपूर्वक उशीर केल्याचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संजीव ठाकूर यांच्या जबाबातून समोर आले आहे. त्यामुळे डाॅ. ठाकूर आणखी अडचणीत सापडले आहेत. ललितवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर लगोलग शस्त्रक्रिया निश्चित कशी करण्यात आली? यामागचे कारण पोलिसांकडून शोधण्यात येत आहे.
ललित पाटील प्रकरणात डाॅ. ठाकूर यांचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत चार वेळा जबाब नोंदविला. ललितला नेमक्या कोणत्या आजाराने ग्रासले होते. त्याचे विश्लेषण करण्यात आले का ?, त्याच्यावर कोणते उपचार करण्यात आले, तसेच उपचारास विलंब का झाला? याबाबतची माहिती पोलिसांना जबाबातून मिळाली.
डाॅ. ठाकूर यांनी उपचारास विलंब करून ललितचा ससूनमधील मुक्काम वाढविला. पाटील याला रुग्णालयातून पसार होण्यासाठी अप्रत्यक्षपणे सहाय केले, असे डाॅ. ठाकूर यांच्या जबाबातून निष्पन्न झाले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
पाटील ससूनमधील कैदी उपचार कक्षातून (वाॅर्ड क्रमांक १६) साथीदारांच्या मदतीने अमील पदार्थांची विक्री करत होता.
पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी ससूनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सापळा लावून ललितच्या साथीदाराकडून दोन कोटी ३२ लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर डाॅ. ठाकूर यांनी ललितच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले होते. ललितवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर लगोलग शस्त्रक्रिया निश्चित कशी करण्यात आली.
आतापर्यंत २० जणांना अटक
ललित पाटील प्रकरणात डाॅ. ठाकूर यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठविला आहे. डॉ. ठाकूर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास डाॅ. ठाकूर यांना अटक होण्याची शक्यता आहे. ललित ससूनमधून पसार झाल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डाॅ. संजय मरसाळे यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी, कारागृहातील दोन कर्मचारी, तसेच ससून रुग्णालयातील एकासह २० जणांना अटक करण्यात आली आहे. डॉ. ठाकूर यांंना पदमुक्त करण्यात आले आहे.