ज्येष्ठ समाजसेविका किरण मोघे यांचे प्रतिपादन
पिंपरी – समाजात वावरताना स्त्रिया अत्याचाराच्या बळी ठरतात. स्त्रियांचे प्रश्न विविधांगी आहेत. कामगार, कष्टकरी, एक नागरिक आणि एक स्त्री अशी तिची विविध रूपे आहेत. राज्यघटनेने दिलेले स्त्री-पुरुष समानतेचे सूत्र प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी अजून खुप काम बाकी आहे. पितृसत्ताक पद्धत, जाती आणि बाजार व्यवस्था अशी आव्हाने स्त्रियांसमोर आहेत. त्यांचा मुकाबला त्या करीत करीत आहेत. त्यांना व्यक्तीगत आयुष्यातही बंडखोरी करावी लागत आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका किरण मोघे यांनी व्यक्त केले.
स्वयंसिद्धा प्रतिष्ठान आयोजित स्वयंसिद्धा पुरस्कार सोहळा नुकताच निगडी-प्राधिकरणातील कॅप्टन जी. ए. कदम सभागृहात पार पडला. मोघे यांच्यासह जेष्ठ लेखिका विनिता ऐनापुरे यांना ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी पुरस्काराला उत्तर देताना मोघे बोलत होत्या. व्यासपीठावर स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा सविता इंगळे उपस्थित होत्या.
रमेश वाकनीस, रजनी सेठ, ऍड. भिमाशंकर कटके, प्रा. भोसले, राजेंद्र घावटे, राज अहेरराव, सुरेश कंक, रघुनाथ पाटील, प्रशांत मोरे, शोभा जोशी, मेधा देसाई, सुप्रिया सोळांकुरे आदी उपस्थित होते. वर्षा बालगोपाल, उज्वला केळकर, मल्लिकार्जुन इंगळे, स्नेहा इंगळे यांनी संयोजन केले. सविता इंगळे यांनी प्रास्ताविक केले.