पुणे – राज्यातील सिंधुदुर्ग येथे जेएन-१ या विषाणूचा रूग्ण सापडला आहे. हा रूग्ण सिंधुदुर्ग येथील ४१ वर्षाचा पुरूष असून त्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती देखील ठिक आहे. मात्र, याबाबत गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर कोविडचे नियम पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
भारतामध्ये जेएन-१ या विषाणूचा रूग्ण केरळमध्ये सापडला आहे. रूग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे या विषाणूची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे. दरम्यान राज्यामध्ये नियमितपणे आढावा घेण्यात येत असून चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. इन्फ्ल्युएंझा आणि सारीच्या रूग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य विभागांना दिल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
“जेएन 1 या कोविडच्या नव्या विषाणूच्या बाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. कुणीही घाबरून जाऊ नये. लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत. याशिवाय कोविड संबंधित नियमावलीचे पालन करा.” -प्रा. डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री