पिंपरी, दि. 14 (प्रतिनिधी) – महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या हाय वॅक्युम सक्शन मशीनच्या स्पेसिफिकेशनवरून घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर वैद्यकीय विभागाने याची चौकशी करण्यास साफ नकार दिला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्वत: आमदारांनी आरोप केलेले असतानाही अधिकारी हात झटकत आहेत.
अतिरिक्त आयुक्तांनी देखील मशीन आणि निविदेतील टेक्निकल स्पेसिफिकेशन तपासण्यास नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे या वादग्रस्त प्रकरणाच्या चौकशीची फाइल आयुक्तांच्या टेबलावर पडून आहे. आयुक्त शेखर सिंह याबाबत काय निर्णय घेणार, याची प्रतीक्षा आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णसेवा पुरवण्यासाठी नुकतेच वैद्यकीय विभागाने हाय वैक्युम सक्षन मशीन खरेदी केल्या. टेक्निकल स्पेसिफिकेशननुसार निविदेतील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचा ठपका पुरवठादारावर ठेवण्यात आला. निविदेतील अटी व शर्ती पात्र करत नसताना वैद्यकीय विभागाकडून मे. सेबर्ड सिस्टम्स आयएनसी या पुरवठादाराला पात्र ठरवण्यात आले. त्यामुळे निविदेतील अटी व शर्तींचे उल्लंघन करून अधिका-यांनी पुरवठादाराला मशीन पुरवठा करण्याचे काम दिल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत वैद्यकीय विभागाने चौकशी करणे अपेक्षित असताना अधिका-यांनी साफ नकार दिला आहे. याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी निवेदन काढून याप्रकरणी अधिकारी आणि ठेकेदार यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रत्यक्ष खरेदी करण्यात आलेल्या मशीन आणि निविदेतील खरेदी करण्यासाठीचे स्पेसिफिकेशन तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिका-यांना दिले होते. मात्र, स्पेसिफिकेशन तपासण्यास वैद्यकीय विभागातील अधिका-यांनी नकार दर्शवून ही फाइल अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या टेबलवर सरकवण्यात आली. अतिरिक्त आयुक्त वाघ हे देखील वादग्रस्त फाइल तपासण्याची जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने आता ही फाइल आयुक्तांच्या टेबलवर पोहचल्याचे समजते. खरेदी केलेल्या मशीन आणि निविदेतील नमूद स्पेसिफिकेशन तपासून आयुक्त काय निर्णय घेतील, हे पहावे लागणार आहे.
प्रशासनाकडून स्पष्टीकरण अपेक्षित
पुरवठादाराने खरेदी केलेल्या मशीनमध्ये निविदेत नमूद तब्बल 14 हून अधिक टेक्निकल स्पेशिफिकेशन मिळते जुळते नसल्याची बाब समोर आली आहे. मशीनमध्ये चुकीचे ऑपरेटिंग सिस्टीम, चुकीचा एअर फ्लो, व्हायरस फिल्टर नसणे, उच्चतम आवाज पातळी, मशीनमध्ये मेंब्रेन प्रणाली नसणे, इलक्ट्रिक शॉक न लागण्याची प्रणाली नसणे, सॉलीडीफायडर नसणे यांसह अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. मशीन खरेदीसाठी राबविण्यात आलेल्या निविदेतील अटी शर्तींचे उल्लंघन का केले?, निविदेतील आणि मशीनचे टेक्निकल स्पेशिफिकेशन मिळते जुळते का नाही?, तांत्रिक तपशील एक नसताना मशीन का घेतल्या?, निविदेतील मशीनची किंमत 6 लाख 80 हजार आणि जीईएम पोर्टलवर याच मशीनची किंमत 3 ते 4 लाखांना कशी काय?, वाढीव दराने मशीन खरेदीचा उद्देश काय?, या प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित आहे.